ठाणे : बहिणीच्या विवाहसोहळ्यातून घरी परतत असताना एका व्यक्तीने फारकत घेतलेल्या पत्नीच्या गळ्यावर वार करुन तिच्या हत्येचा प्रयत्न केला. भर रस्त्यात नातेवाईकांसमोर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी २६ वर्षीय महिलेचे आठ वर्षांपूर्वी एका तरुणासोबत विवाह झाला होता. दोघांचे एकमेकांसोबत पटत नसल्याने अवघ्या दोन महिन्यांमध्येच महिला तिच्या आईकडे राहण्यास आली होती. त्यानंतर समाजातील पंचामार्फत तिने पतीसोबत फारकत घेतली होती. पाच वर्षांपूर्वी तिचा विवाह एका व्यक्तीसोबत झाला. असे असतानाही पहिला पती तिला वारंवार संपर्क साधून त्याच्यासोबत राहण्यास येण्यास सांगत होता. त्यामुळे महिला त्रस्त होती.

काही दिवसांपूर्वीच महिलेच्या बहिणीचा विवाह ठरला होता. २० एप्रिलला विवाह असल्याने महिला भिवंडी येथे नातेवाईकांसोबत आली होती. त्याठिकाणी देखील तिचा पहिला पती आला. त्याने एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेने त्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर तो तेथून निघून गेला. विवाह झाल्यानंतर महिला पायी घरी जात असताना पहिल्या पतीने मागून येऊन तिचे तोंड दाबले. त्यानंतर हातातील चाकूने गळ्यावर वार केला. या हल्ल्यानंतर तो तेथून पळून गेला.

महिलेला तिच्या नातेवाईकांनी तात्काळ भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.