अडीच हजार रुपयांसाठी ओला चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ठाण्यामध्ये उघडकीस आलीय. ठाण्यातील शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ठाण्यातील दिवा परिसरातील खर्डी रोडवर हे हत्याकांड घडलं असून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलीय.

नक्की वाचा >> डोंबिवली: प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरल्याने प्रियकराने घरात घुसून केली तिची हत्या; नंतर तिच्याच बेडरुममध्ये घेतला गळफास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाड्याने ओला गाडी बुक करून काही इसम दिवा येथे जाण्यासाठी हत्या करण्यात आलेल्या तरुणाच्या गाडीत बसले. प्रवासादरम्यान दिव्याजवळील खर्डी रोडवर लघुशंका करण्याच्या बहाण्याने या तरुणांनी गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी पैशांवरुन वाद सुरु केला. या सर्वांनी गाडी चालकाला गाडीखाली उतरवून त्याच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉक मारून त्याची हत्या केली. ठाण्यातील शिळ डायघर पोलीसांना २९ मे रोजी सकळी दिवा गावातील एका शेतकऱ्याने एका अज्ञात इसमाचा खून झाला असून त्याचा मृतदेह खर्डी रोडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील ब्रिजखाली अर्धनग्न परिस्थितीत पडला असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिळ डायघर पोलीस घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी पंचनामा केला असता मयत व्यक्तीच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉक मारून त्याची हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मृतदेहाच्याजवळ एक ओला कंपनीची गाडी उभी असलेली पोलिसांना आढळून आली. तपासादरम्यान पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून ओला कंपनीमार्फत मयताची ओळख पटवली. मयत ओला चालकाचे नाव मोहम्मद आली अन्सारी असून तो घाटकोपर मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लगेचच तांत्रिक यंत्रणाच्या मदतीने तपालासा सुरुवात केली असता पोलिसांनी तब्बल १० तासात आरोपींना गजाआड केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय.

हसिरूल हालीम शेख (३६), आतिश भोसले (२१), ओंकार कासेकर (२१) आणि प्रशांत पेरिय (१९) या चार जणांना अटक केली आहे. तर यात एक अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पाचही जणांना पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींना गांजा आणि नशेची लत आहे. आरोपींनी बदलापूर येथून दिवा येथे येण्यासाठी ओला गाडी बूक केली. गाडी दिवा गावाजवळ आल्यानंतर आरोपींनी गाडी खर्डी रोडजवळ लघुशंका करण्यासाठी थांबवली. नशा करण्यासाठी आरोपींना पैसे हवे होते म्हणून त्यांनी ओला चालकालाच मारहाण करण्यास सुरुवात केली.

ओला चालकाच्या खिशातून आरोपींनी अडीच हजार रुपये आणि एक मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. ओला चालकाने प्रतिकार केला असता आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉकने जोरदार प्रहार करून त्याची हत्या केली. फक्त नशा करण्यासाठी या आरोपींनी ओला चालकाची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या आरोपींनी याआधी अशाप्रकारे काही गुन्हे केले आहेत का याचा तपास शिळ डायघर पोलीस करत असल्याची माहिती कळवा मुंब्राचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane crime ola driver killed by four scsg
First published on: 31-05-2022 at 17:03 IST