ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘भयमुक्त ठाणे’च्या मागणीसाठी येत्या शुक्रवार ९ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घेण्यात आला. या मोर्चात सामाजिक संस्था आणि इतर राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

घोडबंदर परिसरातील मानपाडा, आझादनगर आणि मनोरमानगर विभागाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याच्या निषेधार्थ तसेच ‘भयमुक्त ठाणे’च्या मागणीसाठी विरोधकांच्या वतीने शनिवारी सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या पत्रकार परिषदेला आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पक्ष आणि धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप करत शुक्रवार ९ ऑक्टोबरला पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

‘सामान्य नागरिक भीतीच्या वातावरणात असेल तर सरकार काय करत आहे,’ असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. पोलिसांवर दडपण असल्याचे आम्हाला माहिती आहे. मात्र, पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास योग्य आणि निष्पक्षपणे झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मागील दोन वर्षांतील ठाण्याची परिस्थिती पाहता अनेकजण येथे वास्तव्यास यावे की नाही, याचा शंभर वेळा विचार करत आहेत. ठाण्यात दररोज गुन्हे घडत असून शहराचा ‘बिहार’ झाला आहे, अशी टीका माजी खासदार राजन विचारे यांनी केली. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही पूर्णेकर कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाण्याचे पालकमंत्री कुठे आहेत, असा सवाल करत विचारे यांनी त्यांच्यावर टीका केली.

पूर्णेकर यांच्या हत्येतील आरोपींना आठ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मिळत असल्याचा दावा विचारे यांनी केला. असे असेल तर पोलीस यंत्रणा काय करत होती, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या बदल्या त्यांच्या कृपेने झाल्या असतील, मात्र त्या वर्दीचा तरी मान ठेवा, अशी टीका त्यांनी पोलीस यंत्रणेवर केली. भविष्यात अशा घटना घडल्यास त्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असेल, असेही विचारे म्हणाले. ठाणे शहरातील प्रत्येक नाक्यावर अमली पदार्थ मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ठाणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून सरकार आणि सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला. प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळाला नाही तर भविष्यात विरोधात बोलणाऱ्याला संपविण्याची हिंमत नगरसेवक किंवा राजकीय नेत्यांना मिळेल. त्यामुळे ‘भयमुक्त ठाणे’साठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोर्चानंतरही गुन्हेगारी थांबली नाही तर पुढील मोर्चा योग्य व्यक्तीच्या घरावर नेण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी दिला. गुन्हेगारी करणाऱ्यांना राजकीय संरक्षण देणारा ‘आका’ कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज असल्याचा आरोप त्यांनी केला. बीडमध्ये ज्याप्रमाणे एका ‘आका’ची चर्चा झाली, त्याचप्रमाणे ठाण्यातही एक ‘आका’ असल्याचा दावा करत तो गुंडप्रवृत्तीच्या लोकांना वाचवत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. तर ठाणे शहरात दहशतीचे वातावरण वाढत असल्याने हा लढा सर्वपक्षीय पातळीवर उभा करण्यात आला आहे, असे काँग्रेसचे राहुल पिंगळे यांनी सांगितले.