ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर परिसरात गेल्याकाही दिवसांपासून कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे ठसठसित उदारणे समोर येत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पोलीस यंत्रणेवर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी सिद्धू अभंगेवर पोलीस ठाण्यात झालेला हल्ला, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी हुक्का पार्लर, नशेच्या अड्ड्यांचे दिलेले पुरावे यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

भाजपचे आमदार संजय केळकर हे काही दिवसांपासून हुक्का पार्लर, लेडीज बार, नशेखोरीच्या विषयी आवाज उठवित असतात. विधानसभेमध्येही यामुद्द्यावर आवाज उठविण्यात आला होता. केळकर यांनी ठाणे स्थानक ते घोडबंदरपर्यंत २० हून अधिक नशेखोरीच्या ठिकाणांची यादी पोलीस आयुक्तांना सादर केली. केळकर यांच्यासारखा आमदार मुद्दे उपस्थित करत असतानाच, तसूभरही कारवाई होताना दिसत नाही. ठाणे पोलीस परिमंडळातील उपायुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुकत्तीवरील राजयकीय प्रभाव असल्याचा आरोप अनेकदा होतो. त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसू लागल्याची चर्चा आहे. गेल्याकाही वर्षांमध्ये हाणामारी, अमली पदार्थ, हत्याकांड अशा गंभीर घटना वारंवार शहरात घडत असल्याचे चित्र आहे. महिन्याभरात सर्वाधिक गुन्हे वागळे परिमंडळ अर्थात वागळे इस्टेट, घोडबंदर भागात उघडकीस आले होते. हा भाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येतो. असे असतानाही पोलीस यंत्रणा कमकूवत झाली का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

सुसंस्कृत ठाणे ते हत्याकांड

ठाणे शहराला निसर्गासोबतच समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. साहित्यिक, विचारवंत, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे ठाण्याने स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण केली. राजकीय क्षेत्रातही दिवंगत आनंद दिघे, प्रकाश परांजपे, वसंत डावखरे, बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासारख्या लोकप्रिय आणि सर्वपक्षीय संबंध जपणाऱ्या नेत्यांची परंपरा या शहराने पाहिली. मात्र, गेल्या काही वर्षांत शहराच्या या ओळखीवर गुन्हेगारीच्या घटनांची सावली पडू लागली आहे. किरकोळ वादातून होणाऱ्या मारामाऱ्या, प्राणघातक हल्ले, टोळक्यांमधील संघर्ष, खंडणीसारखे प्रकार आणि अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काही घटना भरवस्तीत, सार्वजनिक ठिकाणी किंवा पोलीस यंत्रणेच्या आवाक्यातील परिसरात घडत असल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

असुरक्षित ठाण्याचा महिन्याभराचा आलेख

  • पूर्णेकर यांच्या हत्येपूर्वी रविवारी कोपरी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचा पदाधिकारी सिद्धू अभंगे याच्यासोबत हाणामारी झाली होती. या घटनेची मोबाईल चित्रफीत प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धू अभंगे याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. – २४ सप्टेंबरला चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर हे आरोपीचा पाठलाग करत असताना आरोपीने त्यांच्या दिशेने वीट फेकली. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
  • वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक ३४ परिसरात ११ सप्टेंबरला पूर्ववैमन्यस्यातून संदीप साळवे याची भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. त्यांच्या शरिरावर अनेक खोलवर घाव होते. हल्ल्यानंतर काहीवेळ ते रक्ताच्या थारोळ्यात उभे. पंरतु त्यांच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. – ७ सप्टेंबरला कापूरबावडी भागात स्वच्छतागृहात जाण्याच्या कारणावरून राजू गुतराथी यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता.

पोलीस यंत्रणा सक्षम आहे. आतापर्यंत जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे १०० टक्के उघडकीस आले असून आरोपी अटक झाले आहेत. तसेच, त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरु असते. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु आहे. – डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण, सह आयुक्त, ठाणे पोलीस. चौकट देशात नशामुक्त भारत आणि ठाण्यात नशामुक्त ठाणे अभियान सुरू आहे. ठाणे शहरात आजही अनेक ठिकाणी अवैध धंदे, हुक्का पार्लर सुरू असल्याने येथे कोंबिंग ऑपरेशनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जागरूक नागरीकांकडून शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अमली पदार्थ विक्रीसंबंधी तक्रारी प्राप्त होत असून याबाबत नियोजनबध्द कारवाई करण्याची आवश्यकता आहे. – संजय केळकर, आमदार.

ठाणे शहरात कायदा सुव्यवस्था उरलीच नाही. ठाण्यात फक्त खून होत आहेत.- अविनाश जाधव, मनसे.