ठाणे – ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नौपाडा भागात एका सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असतानाच, २०२५ मध्ये ठाणे आयुक्तालय क्षेत्रात लैंगिक अत्याचाराची ५१६ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यातील १८५ प्रकरणे ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरातील आहेत. तर उर्वरित प्रकरणे डोंबिवली ते बदलापूर आणि भिवंडी शहरांतील आहेत. तसेच विनयभंगाची देखील ८१३ प्रकरणे आयुक्तालय क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
नौपाडा येथे निर्माणाधीन इमारतीमध्ये एका सात वर्षांच्या चिमूरडीसोबत ४५ वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. या घटनेनंतर राजकीय पक्षाकडून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून बांधकाम क्षेत्रातील मजूरांचे नाव, निवासाचा पत्ता तसेच इतर माहिती पोलीस ठाण्यात नोंद करण्याची मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.
दरम्यान, ठाणे आयुक्तालयातील आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ५१६ लैंगिक अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी ३०२ प्रकरणात १८ वर्षांहून कमी वय असलेल्या अर्थात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या आहेत. तर उर्वरित २१४ प्रकरणांत १८ किंवा त्याहून अधिक वयोगटातील मुली आणि महिलांचा सामावेश आहे. असे असले तरी लैंगिक अत्याचाराची प्रकरणे १०० टक्के उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लैंगिक अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणे ठाणे ते दिवा या शहरात घडले. ठाणे पोलिसांचे परिमंडळ एक आणि परिमंडळ पाच हे क्षेत्र येते. या दोन्ही परिमंडळात एकूण १८५ प्रकरणे उघडकीस झाली आहेत. उर्वरित प्रकरणे इतर परिमंडळात दाखल आहेत. तसेच विनयभंगाची प्रकरणे देखील आयुक्तालय क्षेत्रात दाखल आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ८१३ विनयभंगाची प्रकरणे दाखल असून अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाची २५२ प्रकरणे आहेत. तर उर्वरित १८ किंवा त्याहून अधिक वयोगाटातील मुली आणि महिलांचा सामावेश आहे.
लैंगिक अत्याचाराची प्रकरणे
शहर – प्रकरणे
ठाणे ते दिवा- १८५
भिवंडी – ७८
डोंबिवली, कल्याण- १२५
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर – १२८
एकूण – ५१६
यासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांना संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
