मोटरसायकल चोरीच्या घटनांत वाढ

ठाणे – ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशा तीन घटना समोर आल्या. त्यामध्ये भिवंडीतील विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या एका ४३ वर्षीय व्यक्तीची हिरो होंडा पॅशन प्लस ही मोटरसायकल सोमवारी रात्री चोरटय़ांनी घरासमोरून पळवून नेली. तर कल्याणातील एका ४० वर्षीय व्यक्तीने हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस गाडी चोरटय़ांनी मागील आठवडय़ात पळवली होती. या प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीची फ्रीडम कंपनीची मोटरसायकल चोरटय़ांनी मंगळवारी पळवली.
चोरटा जेरबंद
ठाणे – चेंदणी कोळीवाडा परिसरातील एका घरामध्ये घुसून सोनेरी रंगाचे नकली मंगळसूत्र चोरणाऱ्या एका चोरटय़ाला सोमवारी मध्यरात्री रहिवाशांनी पकडले. निखिल पटेल (२२) असे चोरटय़ाचे नाव असून तो वागळे इस्टेट भागातील राहणारा आहे. रात्रीच्या वेळी घरातील माणसे बोलण्यात गुंतलेले असल्याची संधी साधत घरात घुसून या चोरटय़ाने किचनच्या ओटय़ावर ठेवलेले नकली मंगळसूत्र चोरणचा प्रयत्न केला. मात्र तेथील रहिवाशांनी त्याला व त्याच्या मित्राला पकडले व कोपरी पोलिसांच्या स्वाधीन केले.
ठाण्यात सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
घोडबंदर येथील महात्मा फुलेनगर भागातून अपहरण झालेल्या एका सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली असून याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बुधवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात मोर्चा नेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.घोडबंदर येथील महात्मा फुलेनगर परिसरात पीडित मुलगी राहत असून मंगळवारी पहाटे ती आणि तिची मोठी बहीण घरामध्ये आईच्या शेजारी झोपली होती. त्या वेळी आरोपीने घरामध्ये प्रवेश करून तिचे अपहरण केले. त्यानंतर त्याने परिसरातील एका उद्यानामधील स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच घटनेनंतर त्याने तेथून पलायन केले.दरम्यान, तिच्या रडण्याचा आवाज ऐकून उद्यानाच्या सुरक्षारक्षकाने स्वच्छतागृहात धाव घेतली. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ग्राहकांनी दुकानदाराला लुटले
कल्याण – खडकपाडा येथील व्हॅली कॉम्पलेक्स येथे एका महिलेच्या दुकानामध्ये मंगळवारी चार अनोळखी महिल व पुरुष ग्राहक म्हणून आले. त्यांनी त्या वेळी साडय़ा पाहण्यास मागितल्या मात्र दुकानादार महिलेचे लक्ष नाही हे पाहून सुमारे ३७ हजार रुपयांच्या साडय़ा, घागरा-चोली असे कपडे पळवले. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दुकानदार महिलेने गुन्हा दाखल केला आहे.
सोनसाखळी चोर अटकेत
ठाणे – कोलशेत परिसरामध्ये राहणारी एक २५ वर्षीय महिला मंगळवारी कामावरून घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत असताना कापूरबावडी नाक्यावर आरोपीने त्यांच्या गळ्यातील चैन खेचून पळ काढली. मात्र त्या महिलेने आरडाओरडा केल्याने रहिवाशांनी तात्काळ पकडून या चोरटय़ाला पोलिसांच्या स्वाधीन केले. रामदेव गौड (२४) असे चोराचे नाव असून तो मुंब्रा येथील राहणारा आहे. विरोधात कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीला जादूटोणा करून मारले म्हणून मेहुणीचा खून
पत्नीला जादूटोणा करून ठार मारल्याच्या संशयावरून पतीने आपल्या मेहुणीला मित्रांच्या मदतीने ठार मारल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. कसारा घाटात दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.या प्रकरणात कृष्णा सफाली, संदीप माळी यांना अटक केली आहे. कल्याण न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याणमधील सिंधीगेट भागात राहणाऱ्या उमेश अत्रे यांची पत्नी संगीता गेल्या महिन्यापासून बेपत्ता होती. पती उमेश यांनी सर्वत्र शोध घेतला ती आढळून आली नाही. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. कसारा घाटात पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. चौकशीनंतर हा मृतदेह कल्याण येथील महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले. संगीताची एक बहीण कृष्णा सफाली याची पत्नी होती. तिचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यामुळे कृष्णा व्यथित होता. संगीताने जादूटोणा, करणी करून आपल्या पत्नीला मारले असल्याचा संशय कृष्णाला होता, त्यामुळे मित्रांच्या मदतीने कृष्णाने संगीताचा खून करून तिला कसारा घाटात फेकून दिले होते, असे पोलीस तपासात उघडकीला आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पांढरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.