Thane DMart Billing Fraud: ‘डी-मार्ट’ या घरगुती वस्तू खरेदीच्या मार्टमध्ये एका ग्राहकाने ‘डी-मार्ट’च्याच कर्मचाऱ्याच्या मदतीने तब्बल २० हजार रुपयांच्या वस्तूचे देयक ८८६ रुपये करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा रक्षकांमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात कर्मचारी आणि ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

डी-मार्टमध्ये हजारो नागरिक दररोज वस्तू खरेदी करण्यासाठी जात असतात. मागील काही वर्षांपासून ग्रामीण क्षेत्रामध्येही डी-मार्टची साखळी वाढली आहे. ठाणे शहरातही ठिकठिकणी डी-मार्टच्या शाखा आहेत. अशीच शाखा मानपाडा येथील खेवरा चौक परिसरात आहेत. १७ जून या दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास डीमार्टमध्ये ग्राहकांची गर्दी होती. डी-मार्टमधील नियमानुसार सामान खरेदी केल्यानंतर त्याचे देयक कॅशिअरकडे अदा करावे लागते.

तेथील कॅशिअरकडून मिळालेली देयक पावती प्रवेशद्वारातून बाहेर पडताना सुरक्षा रक्षकांना दाखवावी लागते. त्यावेळी एक ग्राहक खरेदी केलेले सामान घेऊन बाहेर पडत होता. त्याच्याकडे ८८६ रुपयांचे देयक होते. परंतु त्याच्याकडील सामान हे किमतीपेक्षा जास्त असल्याचे सुरक्षा रक्षकांना आढळून आले. त्या ग्राहकाला थांबवून त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता, ते सामान एकूण २० हजार ६२ रुपयांच्या ३९ वस्तू आढळून आल्या. त्यामध्ये छत्र्या, तुरडाळ, चहा पावडर,काजू, पिस्ता, तूप, चिप्सची पाकिटे, तेल, चाॅकलेट, बिस्कीट पाकिटे अशा वेगवेगळ्या वस्तूंचा सामावेश होता.

सुरक्षा रक्षकाने तेथील व्यवस्थापकाला याबाबतची माहिती दिल्यानंतर व्यवस्थापकांनी त्याची चौकशी केली असता, येथील कॅशिअर त्याचा मित्र असून त्यानेच त्याला डी-मार्टमध्ये येऊन खरेदी करण्यास सांगितले होते अशी माहिती त्याने दिली. त्यानंतर कॅशिअरची चौकशी केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. व्यवस्थापकांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यामध्ये कॅशिअर हा सामान स्कॅन न करता केवळ स्कॅनिंगचा दिखावा करत असल्याचे दिसून आले. फुटेज दाखवल्यानंतर त्याने प्रकाराची कबुली दिली. याप्रकरणी डी-मार्टच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.