ठाणे : दहीहंडीच्या जल्लोषाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. दहीकाला भरण्यासाठी लागणारी मडकी, उत्सवासाठी बाळगोपाळांना डोक्याला बांधता येणाऱ्या पट्ट्या, हंडीला सुशोभित करण्यासाठी आवश्यक वस्तूंनी बाजारपेठेला रंगत आली आहे. कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्यासाठी आवश्यक असणाऱ्या लहान मोठ्या मडक्यांच्या खरेदीविक्रीला सुरुवात झाली आहे. मात्र गोविंदांच्या थरांचा केंद्रबिंदू असलेल्या मडक्यांच्या किंमतीत यंदा ५० रुपयांची वाढ झाली आहे.
कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून दहीहंडीच्या तयारीला गोविंदांची लगबग सुरु झाली आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी दहीहांडीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बाजारपेठेत मडक्यांची मागणी वाढू लागली आहे. दहीहंडीसाठी लागणारी मडकी सुरतहून ठाण्यात आणली जातात. ही मडकी माती आणि राखेपासून घडवली जातात. पावसाळ्यात मडकी वाळत नसल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात मडक्यांची निर्मिती सुरू केली जाते. साध्या मडक्यांच्या तुलनेत ही मडकी आकर्षक दिसावी म्हणून फॅब्रिक कलर, रंगीबेरंगी खड्यांनी सजवली जातात. काही विक्रेते तयार मडकी आणून सजावट करतात तर काही विक्रेते मडकी स्वत: घडवून आकर्षक सजावट करून विक्रीसाठी आणतात. बाजारात या मडक्यांची किंमत १०० रुपयांपासून सुरू होत असून, मडक्यावरील नक्षी आणि आकारनुसार त्यांची किंमत वाढत जाते.
रंग महागले; मडकीही महागली
महागाईचा फटका सर्वांनाच बसत असताना रंगांच्या दरात वाढ झाल्याचे मडकी विक्रेत्यांनी सांगितले. रंग तयार करण्यासाठी पेट्रोलचा उपयोग होत असून ९०० रुपयांना मिळणारा रंग आता १३०० रुपयांना मिळत आहे. तर ६०० रुपयांना मिळणारा पाच लिटर च्या थिनरचा डबा ९०० रुपयांना मिळत असल्यामुळे यंदा मडक्यांच्या भावात दरवाढ झालेली आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे ही महागाई झाल्याची माहिती मडकी विक्रेते वाशीम देवर्जी यांनी दिली. तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक खड्यांचे ही दर वाढल्याचे त्यांनी सांगितले.
