ठाणे – दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली ठाणे शहर, वागळे इस्टेट, पोखरण, घोडबंदर रोड, कळवा यांसह विविध भागांतील मैदाने, मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते अडवून मंडप उभारणीला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या चार ते पाच दिवस आधीच म्हणजे, मंगळवारपासूनच मंडप उभारणीच्या कामाला सुरूवात झाल्याचे चित्र असून या मंडपामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊ लागली आहे.

सण-उत्सव साजरे करताना नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच, पालिका प्रशासनाच्या डोळ्यादेखतच राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांच्याशी संबंधित मंडळांकडून रस्ते अडवून मंडप उभारले जात असल्याचे चित्र दिसत आहे. दहीहंडी उत्सवासाठी मंडप उभारण्यास प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या दिल्या जातात. रस्त्याच्या एक तृतीयांश जागेवर मंडप उभारण्यास परवानगी देण्याचा नियम आहे. मात्र, परवानगीची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उभारला जाणारा मंडप यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येते. तसेच उत्सवासाठी काही दिवस आधीपासून रस्ते अडवून ठेवण्याची गरज काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

रस्ता बंद, वाहतूक ठप्प

ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांसह वागळे इस्टेट, पोखरण, घोडबंदर परिसर आणि कळवा भागात आधीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. त्यात रस्त्याच्या कडेला किंवा थेट रस्त्याच्या भागात मंडपाचे लोखंडी सांगाडे उभारल्याने वाहनांसाठी उपलब्ध जागा कमी होत आहे. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवरही मंडप उभारणी सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांनाही घराबाहेर पडताना आणि वाहनांची ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी मंडप उभारणीसाठी साहित्य रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने रस्ता नागरिकांच्या वापरासाठी आहे की उत्सवाच्या मंडपांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राजकीय मंडळांची आघाडी

दहीहंडी उत्सव हा ठाण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असला तरी त्याच्या नावाखाली सार्वजनिक रस्ते आणि मैदाने अडविले जात आहेत. यात राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांच्याशी संबंधित मंडळे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. यावर प्रशासन कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

ठाणे शहरात गणेशोत्सव तसेच दहीहंडी उत्सव मंडप उभारणी नियमानुसार होताना दिसून येत नाही. गणेशोत्सवासाठी तर दोन महिने अधीच रस्ते अडवून मंडप उभारणीचे काम सुरू होते. प्रशासनाने याची दखल घेतली नाहीतर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी दिली. तर, या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त जितेंद्र निकम यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.