ठाणे : भिवंडी येथे धोकादायक इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करुन तोडण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. इमारती रिकाम्या करण्यापूर्वी भाडेकरू आणि सदनिकाधारकांच्या ताब्यातील चटई क्षेत्रफळाची मोजणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधितांना देण्याचेही निर्देश सौरभ राव यांनी दिले.
भिवंडी येथे इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील सी-१ प्रवर्गातील म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी इमारत अतिधोकादायक रिकामी करून तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमारती रिकाम्या करण्यास अडथळा निर्माण झाल्यास संबंधित इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात यावा. इमारत कोसळण्यापूर्वी दिसणाऱ्या धोक्याची माहिती नागरिकांना देण्यासाठी इमारतीवर इशारा फलक लावण्यात यावा अशी सूचना सौरभ राव यांनी केली.
ज्या रहिवाशांकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसेल, त्यांच्यासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या स्थलांतर शिबिरांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे. तसेच, प्रत्येक विभाग स्तरावर तांत्रिक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक स्थापन करून धोकादायक इमारतींची नियमित तपासणी व त्याचा आढावा घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. सी-२ ए, सी-२ बी आणि सी-३ प्रवर्गातील इमारतींबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्याचे आदेशही राव यांनी दिले.
