scorecardresearch

ठाणे : लायसन्स नसतानाही कार शिकणाऱ्या महिलेनं ब्रेकऐवजी क्लच दाबल्याने डिलेव्हरी बॉय गाडी खाली आला; उपचारापूर्वीच मृत्यू

हा संपूर्ण घटनाक्रम अपघात घडलेल्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

ठाणे : लायसन्स नसतानाही कार शिकणाऱ्या महिलेनं ब्रेकऐवजी क्लच दाबल्याने डिलेव्हरी बॉय गाडी खाली आला; उपचारापूर्वीच मृत्यू
ठाण्यामधील धक्कादायक प्रकार (गाड्यांचा फोटो प्रतिनिधिक)

ठाण्यामधील हिरानंदानी इस्टेट इथे एका विचित्र अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ४० वर्षीय महिला वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना तिने गुरुवारी दुपारी एका डिलेव्हरी बॉयला धडक दिली. या धडकेमध्ये अजय ढोकाणे हा डिलेव्हरी बॉय मरण पावला आहे. अपघातानंतर तातडीने अजयला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याचा रुग्णालयामध्ये आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं. या प्रकरणानंतर संबंधित महिला घटनास्थळावरुन फरार झाली आहे.

या महिलेकडे चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना नसून ती वाहन चालवण्यास शिकत असतानाच हा अपघात झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, “हिरानंदानी शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला वॅगनआर कार चालवताना दिसत आहे. ही गाडी पार्क करताना तिने ब्रेकवर पाय देण्याऐवजी क्लचवर पाय ठेवल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर वाटत आहे. या महिलेच्या चुकीमुळे तिच्या गाडीच्या मागून अॅक्टीव्हावर येणाऱ्या अजयला गाडीखाली चिरडलं. या अपघातामध्ये अजयच्या नाकाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली,” असं स्थानिकांनी सांगितलं आहे. तसेच ही महिला रोडास एनक्लेव्ह वूड पार्क या हिरानंदानी इस्टेटमधील इमारतीत वास्तव्यास असून तिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

“अजय हा त्याच्या चौकोनी कुटुंबामध्ये एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याचे वडिलांना दारुचं व्यसन आहे. त्यामुळेच तो घरातील खर्च भागवण्यासाठी एका किराणा मालाच्या दुकानात काम करत होता. तो सामान घरपोच देऊन दुकानामध्ये परत येत असताना हा अपघात झाला,” अशी माहिती अजय ज्या दुकानात काम करायच्या त्याच्या मालकाने दिली. तसेच या मालकाने संबंधित महिलेने आपल्या वकिलांसोबत जवळच्या पोलीस स्थानकामध्ये जाऊन अटकपूर्वी जामीन मिळवल्याचा दावाही केला आहे.

यासंदर्भात कासारवडवली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश बाबशेट्टी यांनी, “आम्ही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन घेता असून प्रकरणाचा तपास सुरु आहे. आम्ही अद्याप चालकाला अटक केलेली नाही कारण हा जामीनपात्र गुन्हा आहे,” अशी माहिती दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या