ठाणे : ठाणे शहराच्या प्राणवायूचा अखंड स्त्रोत असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला धक्का पोहचवून आखला गेलेला ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्प भविष्यात ठाणेकरांसाठी अजस्त्र अशा कोंडीचे कारण ठरेल. आधीच कोंडीत सापडलेल्या जुन्या ठाणे शहरात कोणतीही आवश्यकता नसताना अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एक प्रकल्प संपत नाही तोच दुसरा प्रकल्प ठाणेकरांच्या माथी मारला जातोय.

या प्रकल्पांच्या ओझ्याखाली सर्वसामान्य ठाणेकर अक्षरश: पिचला जात आहे, अशी परखड टिका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लोकसत्ता ‘लोकसंवाद’ या उपक्रमात बोलताना व्यक्त केली. हे प्रकल्प राबविताना ठाणेकरांना विचारात तरी घेतले जात आहे का, असा प्रश्न मला एक ठाणेकर रहिवाशी म्हणून सतत पडतो, असेही परांजपे यावेळी म्हणाले.

‘लोकसत्ता लोकसंवाद’ उपक्रमात बोलताना आनंद परांजपे यांनी शहरात उभे रहाणारे विकास प्रकल्प, वाढते प्रदूषण, वृक्षांची कत्तल, रेल्वे प्रकल्पांविषयी असलेली अनास्था, ठाणे महापालिकेतील बजबजपुरी अशा वेगवेगळ्या विषयांवर टोकदार मते व्यक्त केली.

‘ठाण्यात एकाच वेळी पाच ते सहा मोठे प्रकल्प राबविले जात आहेत. त्यात ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचा समावेश आहे. हा प्रकल्प राबविण्याची अजिबात गरज नव्हती. ठाणे ते बोरीवली अंतर पाच मिनीटात पुर्ण होईल असा गाजावाजा या प्रकल्पांच्या निमीत्ताने केला गेला. प्रत्यक्षात एका नव्या आणि अजस्त्र अशा कोंडीचे निमंत्रण घेऊनच हा प्रकल्प ठाणेकरांपुढे येऊन आदळणार आहे. या एका प्रकल्पांमुळे मुंबई तसेच नवी मुंबई शहरातील वाहनांचा भार ठाण्यावर पडणार आहे.

सध्याचा ग्लॅडी अल्वोरिस मार्ग आधीच कोंडीचा ठरला आहे. या भागात उभ्या रहाणाऱ्या गृह संकुलांमुळे वाहनांच्या संख्येत भर पडणार आहे. असे असताना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण यासारख्या भागातून या मार्गावर येणारा वाहनांचा भार सोसावणारा नसेल, अशी भीती परांजपे यांनी व्यक्त केली. कोंडी सोडविण्यासाठी एक प्रकल्प आखायचा आणि दुसऱ्या मोठी कोंडीत अडकायचे असा हा प्रकार असल्याची टिकाही त्यांनी केली.

ठाण्यात अंतर्गत मेट्रो कशासाठी ?

ठाण्यात आधीच मेट्रोची एक मार्गिका अस्तित्वात आहे. ही मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. अशावेळी शहरात अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्याची घाई का, असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला. खरे तर हा प्रकल्प राबविण्याची अजिबात आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. सावरकर नगर ते कॅडबरी जंक्शन हे अंतर अवघे दोन किलोमीटर आहे. इतक्या कमी अंतरासाठी मेट्रोची आवश्यकता नाही.

आधीच कोंडीत आणि दाटीवाटीत असलेल्या ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबविणे किती व्यवहार्य ठरेल याचा विचार होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सर्वसामान्य ठाणेकरांचा दररोज होणारा रेल्वे प्रवास जिकीरीचा असताना असे प्रकल्प आखताना विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. अंतर्गत मेट्रो प्रकल्पास विरोध करत असताना ठाणे शहराबाहेरून अवजड वाहतूक व्हावी यासाठी खाडीकिनारी मार्ग आणि आनंदनगर ते साकेत पुर्वमुक्त मार्ग या दोन मार्गांची शहराला गरज आहे, असे मात्र त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पांचे ओझे आणि पिचलेला ठाणेकर

विकासाच्या नावाखाली शहरात सध्या काही प्रकल्प ठाणेकरांवर जबरदस्तीने लादले जात आहेत, असा आरोप परांजपे यांनी यावेळी केला. घोडबंदर रोडवरील सेवा रस्ता काढून टाकण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला. यामुळे नेमके काय साध्य होणार आहे हा खरा प्रश्न आहे. असे केल्यामुळे अनेक सोसायट्यांचे प्रवेशद्वार थेट महामार्गाला जोडले गेले आहेत. परिणामी, अपघातांचा धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. शिवाय येथे वाहतुकीचा आणि कोंडी ताणही वाढला आहे.

एकामागोमाग एक आखल्या जाणाऱ्या या प्रकल्पांमुळे ठाण्यात प्रदूषण वाढत आहे. शहराची पर्यावरणीय स्थिती अधिकच धोकादायक होत चालली आहे. आधी हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, हे प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. परंतु एका प्रकल्पाचे काम पुर्ण झालेले नसतानाही त्यामागे एक-एक करून आणखी प्रकल्प लादले जात आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. दुर्दैवाने यामध्ये ठाणेकर पिचला जात आहे.

सर्वसामान्य ठाणेकरांचा या प्रक्रियेत साधा विचार तरी होतोय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझी राजकीय भूमिका बाजूला ठेवा. पण एक ठाणेकर म्हणून, ज्याचा जन्म ठाण्यात झाला, ज्याने नौपाडा आणि जुने ठाणे पाहिले आहे. अशा माझ्यासारख्या ठाणेकराला आजची ही परिस्थिती अत्यंत अस्वस्थ करणारी वाटते, असे मतही त्यांनी मांडले. घोडबंदर रोडवर मानपाड्याच्या पुढे रात्री नऊ नंतर जायचे म्हटले तरी मनात भीती निर्माण होते की वाहतूक कोंडीत अडकून पडले की काय, हे जे बदलत ठाण आहे, ते चित्र योग्य नाही, असेही ते म्हणाले.