ठाणे – आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) या सारख्या यंत्रणांसोबत समन्वय कसा ठेवावा, अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा आणि बचाव कार्य अधिक वेगाने कसे करावे, याचे प्रत्यक्ष ज्ञान स्थानिक यंत्रणांना देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी स्थानिक यंत्रणांना आपत्ती निवारणाचे धडे देऊन प्रशिक्षित करणार असून यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्याची चिन्हे आहेत.
नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता महत्वाची असून यासाठीच ठाणे जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. ठाणे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘परिचय सराव कार्यक्रम’ आयोजित केला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून प्रत्येक सत्रात २०० प्रशिक्षणार्थी सहभागी होतील. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार असून या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे एकूण २५ अनुभवी अधिकारी तसेच कर्मचारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये १ राजपत्रित अधिकारी , २ दुय्यम अधिकारी आणि २२ अन्य पदांच्या जवानांचा समावेश आहे. ही तुकडी जिल्ह्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रांत आणि ग्रामीण भागात जाऊन स्थानिक यंत्रणेला प्रशिक्षित करणार आहे. त्यात आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल या सारख्या यंत्रणांसोबत समन्वय कसा ठेवावा, अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा आणि बचाव कार्य अधिक वेगाने कसे करावे, याचे प्रत्यक्ष ज्ञान स्थानिक यंत्रणांना दिले जाणार आहे.
ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांनी या उपक्रमाच्या नियोजनासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. या प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसिलदार सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. केवळ शासकीय अधिकारीच नव्हे, तर स्थानिक स्वयंसेवक, नागरी संरक्षण दल, पोलीस पाटील आणि ‘आपदा मित्र-सखी’ यांनाही या सरावात निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे आपत्तीच्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी धावून जाणाऱ्या स्थानिक मदतीला तांत्रिक ज्ञानाची जोड मिळणार आहे.
प्रशिक्षण कधी व कुठे
२ एप्रिल: नवी मुंबई महानगरपालिका (मुख्यालय सभागृह), ४ एप्रिल: उल्हासनगर महानगरपालिका (सिधूभवन ऑडिटोरियम), ६ एप्रिल: ठाणे महानगरपालिका (नरेंद्र बल्लाळ हॉल), ७ एप्रिल: मिरा-भाईंदर महानगरपालिका (नगर भवन, भाईंदर प.), ८ एप्रिल: भिवंडी निजामपूर महानगरपालिका (राजय्या गाजेगी हॉल), ९ एप्रिल: तहसिलदार कार्यालय शहापूर (शेतकी भवन), १० एप्रिल: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (बिर्ला कॉलेज, कल्याण), १३ एप्रिल: तहसिलदार कार्यालय, मुरबाड (एमआयडीसी सभागृह), १५ एप्रिल: तहसिलदार कार्यालय अंबरनाथ (आदर्श हायस्कूल, बदलापूर).
