ठाणे : जिल्ह्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्यास असलेल्या १३ बालकांच्या आयुष्याला आता कुटुंबाच्या मायेची ऊब मिळणार आहे. ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत या बालकांची अधिकृत दत्तक प्रक्रिया पूर्ण झाली असून, चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना नव्या कुटुंबाचा आधार मिळाला आहे. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण अर्थात काराच्या माध्यमातून ‘मिशन वात्सल्य’ पोर्टलवर नोंदणी करून कायदेशीर व अधिकृत प्रक्रियेद्वारे या बालकांना पालकत्व बहाल करण्यात आले. त्यात देशांतर्गत १२, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका प्रकरणाचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यात डोंबिवली व नवी मुंबई येथे बालगृह आहेत. त्यात राहणाऱ्या बालकांना दत्तक घेण्यासाठी दरवर्षी विविध अर्ज येत असतात. मात्र, संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व पालकांची पार्श्वभूमी तपासूनच मुलांची दत्तक प्रक्रिया राबविली जाते. याच पद्धतीने आता या १३ बालकांची प्रक्रिया पार पडली आहे.दत्तक प्रक्रियेसाठी इच्छुक पालकांनी काराच्या ‘मिशन वात्सल्य’ पोर्टलवर नोंदणी केली होती. त्यानंतर निर्धारित नियम व प्रक्रियेनुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करून १३ बालकांचे दत्तक पालकत्व निश्चित करण्यात आले.दत्तक प्रक्रियेतून बालकांना केवळ नवीन घर नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा आधार, प्रेम, सुरक्षितता आणि चांगल्या भवितव्याची संधी मिळते.
बालकांना कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अधिकृत दत्तक प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे.या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दत्तक पालकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. बालकांना प्रेम, सुरक्षितता, उत्तम शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. बालकांच्या भावनिक व सामाजिक विकासासाठी कुटुंबातील वातावरण महत्त्वाचे असून, पालकांनी त्यांना आपलेपणाने आणि संवेदनशीलतेने वाढवावे, असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, दीर्घ प्रतीक्षेनंतर बालकांना आपल्या कुटुंबाचा भाग बनविण्याची संधी मिळाल्याबद्दल उपस्थित दत्तक पालकांनी समाधान व्यक्त केले.
आपल्या कुटुंबाला या प्रक्रियेमुळे खऱ्या अर्थाने पूर्णत्व मिळाल्याची भावनिक प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा आधार आणि सुरक्षित भविष्य मिळणे ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि सकारात्मक बाब आहे. त्यामुळे काराच्या माध्यमातून होणाऱ्या अधिकृत दत्तक प्रक्रियेला प्रोत्साहन देत, पात्र बालकांना कुटुंब मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन तसेच विशेष दत्तक संस्थांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सिंगापूरमधील कुटुंब
ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रक्रियेत पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, तेलंगणा तसेच महाराष्ट्रातील नागपूर, गोंदिया, रायगड आणि ठाणे येथील दत्तक पालक सहभागी झाले होते. याशिवाय सिंगापूरमधील एका कुटुंबानेही अधिकृत प्रक्रियेतून बालकाचे पालकत्व स्वीकारले आहे.
