ठाणे : दिवाळी सणाच्या काळात आकाशदीप (फ्लाइंग लँटर्न) उडविण्यामुळे आग लागण्यासह जीवित व मालमत्तेच्या नुकसानीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यात आकाशकंदील उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून १९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आकाशदीप उडविणे, त्यांची विक्री करणे तसेच साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, ५ नोव्हेंबर ते बुधवार, ११ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रम आणि उत्सव साजरे होणार आहेत. यामध्ये ५ नोव्हेंबर रोजी वसुबारस, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, ८ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन, १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा, तर ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी होणार आहे. या काळात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आकाशदीप उडविले जातात. मात्र, आकाशात उडविण्यात येणारे हे कंदील हवेत असताना त्यांना आग लागल्यास ते जळत्या अवस्थेत जमिनीवर पडू शकतात. त्यामुळे घरांवर, इमारतींवर किंवा इतर ज्वलनशील वस्तूंवर पडून आग लागण्याबरोबरच गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही संभाव्य जोखीम लक्षात घेऊन आकाशकंदिलांच्या वापरावर निर्बंध घालण्याची विनंती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मनाई आदेश लागू केला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आकाशकंदील उडविणे, त्यांची विक्री करणे आणि साठवणूक करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. हा आदेश ५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या आदेशानंतर देखील नागरिकांकडून जळते आकाशकंदील उडविले अथवा व्यापाऱ्यांनी त्याची विक्री केली तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येईल.