HPV Vaccination For 17,000 Girls In Thane Rural Areas: महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर (सर्व्हायकल कॅन्सर) आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वाची लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ही मोहीम सुरू करण्यात येणार असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अंबरनाथ आणि बदलापूर पालिका क्षेत्रातील सुमारे १७ हजार मुलींना ‘गार्डासिल’ ही एचपीव्ही लस मोफत देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून यासाठी नियोजनाची प्रक्रिया सुरू असून शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा अत्यंत गंभीर आणि वेगाने वाढणारा आजार मानला जातो. हा कर्करोग मुख्यत्वे ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ (एचपीव्ही) या विषाणूमुळे होतो. एचपीव्ही हा एक सामान्य विषाणू असून त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही प्रकार महिलांच्या गर्भाशयाच्या मुखातील पेशींमध्ये बदल घडवून आणतात आणि कालांतराने त्यातून कर्करोगाची निर्मिती होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे स्पष्ट दिसून येत नाहीत, त्यामुळे अनेकदा निदान उशिरा होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणाला अत्यंत महत्व दिले जात आहे. भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या कर्करोगांपैकी हा एक असल्याचे आरोग्य विभागाच्या विविध आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात आरोग्य तपासणीची कमतरता आणि जागरूकतेचा अभाव यामुळे या आजाराचे प्रमाण अधिक आढळून येते.
या पार्श्वभूमीवर १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या वयोगटात लसीकरण केल्यास शरीरात विषाणूविरुद्ध मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः मुली प्रौढत्वाच्या टप्प्यात जाण्यापूर्वी लस दिल्यास भविष्यात एचपीव्ही संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांमध्ये किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून पात्र मुलींची यादी तयार केली जात आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये तसेच शाळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पालकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येणार आहे. दरम्यान, या मोहिमेच्या माध्यमातून केवळ लसीकरणच नव्हे तर महिलांच्या आरोग्याबाबत व्यापक जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे. किशोरवयीन मुलींचे आरोग्य, स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी आणि कर्करोग प्रतिबंध याबाबत माहिती देण्यासाठी विशेष उपक्रमही राबविले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारी ही मोहीम भविष्यात महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाची पाऊल ठरणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामीण भागात आणि अंबरनाथ, बदलापूर पालिका क्षेत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. तर उर्वरित शहरी भागात स्थानिक महापालिका प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. – डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे</strong>
