ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी मनाई आदेश लागू केला आहे. मात्र, या निर्णयाचा फटका आता गृहसंकुलांना बसू लागल्याचे चित्र आहे. विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत असतानाच, गृहसंकुलातील विद्युत जनित्र (जनरेटर) करीता डिझेल उपलब्ध होत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. डिझेलसाठी त्यांना वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास तातडीने मनाई केली आहे. या निर्णयाची २७ मार्च पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या या आदेशानुसार, आता जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीमध्येच वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विकता येणार नाही. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापकांची असणार आहे, अशा सुचना जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिल्या होत्या. मात्र, या निर्णयाचा फटका आता गृहसंकुलांना बसू लागल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने संकुलांच्या इमारती उदवाहक तसेच विद्युत मोटार या जनित्रवर चालविण्यात येतात. परंतु जनित्र करीता डिझेल उपलब्ध होत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. डिझेलसाठी त्यांना वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आहे.

जनित्रमध्ये एका पातळीपर्यंत डिझेल ठेवावे लागते. त्याखाली पातळी आली तर, जनित्रमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते काम करत नाही. गेले काही दिवस आम्ही डिझेलसाठी पंपावर जात आहोत, परंतु बंदी आदेशामुळे ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे आमच्यापुढे संकट उभे राहिले आहे. डिझेल अभावी जनित्र बंद झाले आणि त्यातच विद्युत पुरवठा खंडीत झाला तर, उंच माळ्याच्या इमारतीमधील नागरिकांना जिन्याने घरातून बाहेर पडणे आणि पुन्हा घरी जाणे शक्य होणार नाही, असे घोडबंदरमधील सुकूर सफायर संकुलाचे पदाधिकारी सुव्रत बेडेकर यांनी सांगितले.

आम्ही गेले चार ते पाच दिवसांपासून विविध पंपावर जाऊन डिझेल देण्याची विनंती करत आहोत. गृहसंकुलाच्या जनित्रसाठी डिझेल द्या अशी विनंती करत आहोत. परंतु बंदी आदेशामुळे ते कॅनमध्ये डिझेल देत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे, अशी माहिती घोडबंदरमधील ग्रीन स्क्वेअर संकुलाचे पदाधिकारी जनार्दन लाड यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात उंच-उंच इमारती उभारल्या जात आहेत. या इमारतींमध्ये विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर उदवाहक जनित्रवर चालविण्यात येतात. यामुळे नागरिकांना विनाअडथळा उदवाहकाचा वापर करता येतो. तसेच पाणी पुरवठ्यासाठी असलेल्या मोटार आणि विद्युत दिवेही जनित्रवर चालविण्यात येतात. पाणी मोटार बंद झाली तर त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो.