एका दिवसात ५५०० ब्रास रेती जप्त; डोंबिवली, कल्याण, भिवंडी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
बेकायदा रेतीउपसा करून निसर्गास हानी पोहोचवणाऱ्या तसेच शासकीय महसूल बुडवणाऱ्या रेतीमाफियांविरोधात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या आदेशानंतर डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसर तसेच कल्याण रेतीबंदर परिसरातून ४७ क्रेनसह ४५०० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. तर भिवंडी येथील काल्हेर आणि कशेळी रेती बंदरांवरही महसूल विभागाच्या भरारी पथकांनी धाडी टाकून एक हजार ब्रासहून अधिक बेकायदा रेती जप्त केली.
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील रेतीबंदरात बेकायदेशीररीत्या रेती उत्खननाचे काम सुरू आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच कल्याण प्रांत अधिकारी प्रसाद उकरडे तसेच कल्याण तहसीलदार किरण सुरवसे आपल्या फौजफाटय़ासह तेथे पोहोचले. या ठिकाणी एकंदर ३३ क्रेन तसेच ४०० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. दिवसभरात अशाच प्रकारची कारवाई कल्याण रेती बंदर येथे नायब तहसीलदार उद्धव कमद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या ठिकाणाहून १४ क्रेन व ४००० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या क्रेनची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. हा रेतीउपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.
महसूल विभागाच्या भरारी पथकांनी भिवंडी येथील काल्हेर आणि कशेळी रेती बंदरांवरही छापे टाकले. या कारवाईत कशेळीहून २३९ ब्रास तर काल्हेरहून ८२७ ब्रास असा मोठा रेतीसाठा जप्त करण्यात आला. पात्रात डुबी मारून हातपाटीने रेती काढण्याचे काम या ठिकाणी सुरू होते असे उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणांहून जप्त करण्यात आलेला रेतीसाठा १०६६ ब्रास इतका आहे. या कारवाईत भिवंडी तहसीलदार वैशाली लंभाते, विनोद गोसावी तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.