ठाणे : ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाला बाॅम्बने उडविण्याची देण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. या घटनेनंतर ठाणे जिल्हा न्यायालयालाचा परिसर रिकामा करण्याची तयारी पोलिसांकडून सुरु होती. दरम्यान, नागरिक आणि वकिलांमध्ये या घटनेमुळे भिती पसरली होती.

ठाणे सत्र न्यायालय कोर्टनाका भागात आहे. हजारो नागरिक दररोज सत्र न्यायालयात येत असतात. काही दिवसांपूर्वीच या न्यायालयाची इमारत नव्याने बांधण्यात आली होती. सोमवारी दुपारी ठाणे सत्र न्यायालयाला मेल वरुन बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

नागरिक आणि वकिलांमध्येही भितीचे वातावरण परसले होते. न्यायालयाच्या कामकाजावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर न्यायालयाचा परिसर रिकामा करण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांकडून सुरु होती. तसेच, न्यायालय परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात येत होता.

हा प्रकार इतर काही जिल्हा न्यायालयांमध्येही झाला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी हे कृत्य केले असावे असा अंदाज पोलिसांचा आहे. दरम्यान, या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली आहे.