ठाणे : भिवंडी येथील कोहीनूर इमारत दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींमधील वास्तव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीत सात हजारहून अधिक इमारती अतिधोकादायक आणि धोकादायक स्थितीत असून अनेक इमारतींमध्ये जीव धोक्यात घालून नागरिक वास्तव्य करत आहेत. मागील काही वर्षामध्ये जिल्ह्यात इमारत कोसळून दुर्घटना घडत असल्याने या इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला असल्याचे चित्र आहे.
भिवंडीतील नारपोली येथील कोहीनूर या तळ अधिक चार मजली इमारतीचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. भिवंडी महापालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून रहिवाशांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, काही कुटुंबे अद्यापही तेथे राहत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु जिल्ह्यात अनेक धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य सुरुच असल्याचे आढळून आले.
पावसाळ्यात जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती कोसळून त्यात जिवितहानी होऊ नये यासाठी महापालिकांकडून अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर अतिधोदायक इमारतीतील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली जाते. तसेच, ज्या इमारतीत दुरुस्ती शक्य आहे. त्यांना संरचनात्मक दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या जातात.
ठाणे महापालिका प्रशासनाने नुकत्याच केलल्या सर्वेक्षणात ९३ अतिधोकादायक तर, ४ हजार ३४४ धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. गेल्यावर्षी ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यापैकी ३६ इमारती रिकाम्या करण्यात पालिकेला शक्य झाले होते. यदांच्या सर्वेक्षणानुसार, ९३ अतिधोकादायक तर, ४ हजार ३४४ धोकादायक इमारतीमध्ये ८९ हजार ८३५ कुटूंब वास्तव्यास असून या कुटूंबातील सदस्य संख्या ३ लाख ४९ हजार २१९ इतकी आहे. तसेच या इमारतींत १० हजार ८७० इतके वाणिज्य गाळे आहेत.
भिवंडी महापालिका क्षेत्रात १ हजार ७९० इमारती धोकादायकस्थितीत असून त्यापैकी २२७ इमारती अतिधोकादयक असून राहण्यास योग्य नाहीत. भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी सुमारे महिन्याभरापूर्वीच अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अतिधोकादायक स्थितीतील इमारत तात्काळ निर्मनुष्य करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच इमारतीचे पाडकाम करण्याची सूचनाही केल्या होत्या. परंतु त्यानंतरही भिवंडीत कोहीनूर इमारत दुर्घटना झाल्याने महापालिकेच्या कारभाराविषयी चर्चा होत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ४५१ धोकादायक इमारती असून त्यापैकी २२५ अतिधोकादायक इमारती आहेत. बहुतांश इमारती २५ ते ३० वर्ष जुन्या असून काही इमारतीमध्ये नागरिक भाडेतत्त्वावर वास्तव्य करतात. उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींची संख्या २८३ इतकी आहे. विशेष म्हणजे शहरात १४४ इमारती या कोणत्याही संरचनात्मक लेखापरिक्षणाविना असल्याची माहिती पालिका प्रशासनाने मे महिन्यात दिली होती. शहरात निष्काशीत करण्यायोग्य इमारतीची संख्या ६ असून इमारत रिकामी करून दुरूस्ती करण्यायोग्य इमारती ३४ आहेत. रिकामी न करता दुरूस्ती करण्यायोग्य इमारती २२७ आहेत. तर किरकोळ दुरूस्तीयोग्य इमारतींची संख्या १६ आहे.
बदलापूर शहरात धोकादायक इमारतींची संख्या २३ असून अतिधोकादायक इमारत अवघी एक आहे. रिकामी करून दुरूस्त करण्यायोग्य इमारती १४ असून रिकामी न करता दुरूस्तीयोग्य इमारती ८ आहेत. तर अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रात २३८ इमारती धोकादायक इमारती आहेत.
