ठाणे : उद्योग संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत जिल्हा उद्योग केंद्र ठाणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेंतर्गत उत्पादन प्रवर्गासाठी प्रकल्प किंमत रुपये १ कोटीपर्यंत, तर सेवा व कृषीपूरक व्यवसायासाठी रुपये ५० लाखांपर्यंत उद्योग उभारणीसाठी शासनाकडून १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उद्योग केंद्राकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे उद्योग निर्मिती करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजना मार्गी लावण्यासाठी स्थानिक स्तरावर जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातू या योजना राबविण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर युवा वर्गाला स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. १८ वर्षे पूर्ण झालेले सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती या योजनेसाठी पात्र असून संपूर्ण अर्जप्रक्रिया ऑनलाईन आहे. योजना केवळ नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांसाठी लागू राहणार असून “एक कुटुंब एक लाभ” हा निकष ठेवण्यात आला आहे. कुटुंबाची व्याख्या पती व पत्नी अशी करण्यात आली आहे.

यामध्ये १० लाखांवरील उत्पादन उद्योगांसाठी तसेच ५ लाखांवरील सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उत्पादन उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा रुपये १ कोटी, तर सेवा व कृषीपूरक व्यवसायासाठी रुपये ५० लाख निश्चित करण्यात आली आहे. योजनेत स्वगुंतवणूक, बँक कर्ज व शासन अनुदान अशा तीन घटकांद्वारे प्रकल्प उभारणी केली जाणार आहे.

अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व अल्पसंख्याक घटकांसाठी कमी स्वगुंतवणूक व अधिक अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अनुदानाचे प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत अधिक ठेवण्यात आले आहे.

चौकट पात्र इच्छुकांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे येथील उद्योग निरीक्षकांशी संपर्क साधता येईल. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा व यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी केले आहे.