ठाणे : भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यात ७५ किमी आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात केली आहे. ९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या या यात्रेच्या मार्गामध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश होता. मात्र, त्यात अचानकपणे बदल करत ठाणे जिल्हा वगळण्यात आला असून यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी सक्षम नव्हते का ? तसेच यात्रा रद्द करण्यामागे पक्षातील गटबाजीचे कारण तर नाही ना, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने केंद्र तसेच राज्य शासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर भारतीय काँग्रेस पक्षानेही देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ किमी गौरव पदयात्रा काढण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक राज्यातील पदाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले होते. या यात्रेच्या माध्यमातूुन भारत जोडो आभियान राबवून पक्षाची ताकद वाढविण्याच्या उद्देशातून ही यात्रा काढण्यात येत आहे. भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यात ७५ किमी आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले असून त्यासाठी जिल्हानिहाय पदयात्रेचा मार्ग निश्चित केला होता. त्यानुसार ४ ऑगस्ट रोजी कार्यक्रम पत्रिका जाहीर केली होती. ९ ऑगस्टला वर्धा येथील सेवाग्राम आश्रम येथून यात्रेला सुरुवात होणार असून १४ ऑगस्टला पुणे येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे स्वत: सामील होणार आहेत. या यात्रेच्या मार्गामध्ये ठाणे जिल्ह्याचाही समावेश होता. १३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यातून ही पदयात्रा जाणार होती. ८ ऑगस्ट रोजी प्रदेश कमिटीने सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असून त्यात यात्रेच्या मार्गातून ठाणे जिल्हा वगळण्यात आला आहे. अचानकपणे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीने ४ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत ठाणे जिल्ह्यातून यात्रा जाणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी यात्रेच्या पुर्वतयारीसाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. ठाणे शहरातील एन.के.टी.सभागृहात ही बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर प्रदेश कमिटीने सुधारीत कार्यक्रम पत्रिका जाहीर करून त्यात ठाणे जिल्हा वगळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीनंतर प्रदेश कमिटीने असा निर्णय का घेतला असावा, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या यात्रेच्या नियोजनासाठी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी सक्षम नव्हते का ? तसेच यात्रा रद्द करण्यामागे पक्षातील गटबाजीचे कारण तर नाही ना, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

प्रदेश कमिटीने आझादी गौरव पदयात्रेसाठी ठाणे जिल्ह्याचा मार्ग निश्चित केला होता. परंतु वेळेअभावी ठाणे जिल्ह्यातून पदयात्रा काढणे शक्य नसल्यामुळे ती रद्द करण्यात आली आहे. प्रदेश कमिटीने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी सक्षम नव्हते का ? तसेच यात्रा रद्द करण्यामागे पक्षातील गटबाजीचे कारण तर नाही ना, अशी चर्चा शहरात रंगली असून या चर्चेंत काहीच तथ्य नाही.

विक्रांत चव्हाण, ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष