जिल्ह्य़ाला दीड लाख लशींचा पुरवठा

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिक करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

शासकीय लसीकरणाला वेग येण्याची चिन्हे

ठाणे : जिल्ह्य़ात जुलै महिन्यात लशींच्या तुटवडय़ाअभावी तसेच अतिवृष्टीमुळे लसीकरण मोहिमेत अनेकदा खंड पडल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांना रांगा लावूनही आणि कुपन घेऊनही लस न घेताच घरी परतावे लागले होते. मात्र आता लसीकरण मोहिमेला पुन्हा वेग येण्याची चिन्हे आहेत. अनेक दिवसांनंतर जिल्ह्य़ाला गुरुवारी १ लाख ५१ हजार लशींचा साठा उपलब्ध झाला आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिक करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी असो किंवा केंद्रांवर जाऊन रांगा लावणे यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. जुलै महिन्यात शासनाकडून ठाणे जिल्ह्य़ाला उपलब्ध होणारा लशींचा साठा पुरेसा नव्हता. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनासमोरही लसीकरण केंद्रांचे नियोजन करताना पेच निर्माण होत आहे. जिल्ह्य़ात लाभार्थी नागरिकांमध्ये लशीची पहिली मात्रा न घेतलेल्यांची संख्याही मोठी आहे. दुसऱ्या मात्रेची कालमर्यादा संपत आली आहे, असे नागरिकही दुसरी मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर वणवण फिरत आहेत. लशींचा साठा अपुरा येत असल्यामुळे अनेक केंद्रांवर ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण होत आहे.

आठवडय़ाभरानंतर सोमवारी लसीकरण केंद्रे सुरू झाली त्यावेळी नागरिकांनी पहाटे तीन वाजल्यापासून कुपन घेण्यासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. त्यातही केंद्रावर लस साठा पुरेशा प्रमाणात नसल्याने अनेकांना लसविनाच परतावे लागले. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्य़ाला खूप दिवसांनंतर गुरुवारी शासनाकडून १ लाख ५१ हजार लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. या साठय़ामुळे लसीकरण मोहिमेला पुन्हा वेग लागण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्यातील लशींचा साठा

दिवस   कोव्हिशिल्ड     कोव्हॅक्सिन      एकूण

१ जुलै    २७४००          १५२००          ४२६००

६ जुलै   ६००००             –                ६००००

९ जुलै   ४२०००            ५३४०           ४७३४०

१२ जुलै  २५०००             –                २५०००

१४ जुलै   ५३०००            –                ५३०००

१६जुलै    २९०००          १६८०           ३०६८०

२१जुलै    २५०००          ६२४०          ३१२४०

२३जुलै    २५०००           ११८४०          ३६८४०

२६जुलै     ४६३९०              –             ४६३९०

२८ जुलै   १,१७,०००      ३४,०००    १,५१,०००

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane district get 1 5 lakh vaccines doses on thursday zws

ताज्या बातम्या