ठाणे – राज्यात दरवर्षी उन्हाचा पारा वाढत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने ‘मिशन शितल कवच’ या विशेष उपक्रमांतर्गत व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. प्रशासकीय विभाग, महानगरपालिका, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या समन्वयातून नागरिकांचे संरक्षण आणि जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर शहरांमधील सार्वजनिक ठिकाणी सावली आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. बसस्थानके, बाजारपेठा, रिक्षा स्टँड यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या शेड उभारण्याचे तसेच ‘वॉटर एटीएम’ किंवा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. मॉल्सनीही सर्वसामान्य नागरिकांसाठी थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच दुपारी १२ ते ४ या कालावधीत शहरातील उद्याने खुली ठेवून नागरिकांना विश्रांतीची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य विभागाकडून उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र थंड किंवा वातानुकूलित वॉर्ड तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार देण्यासाठी ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ तैनात राहणार आहेत. लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि मजूर यांसारख्या असुरक्षित गटांपर्यंत जनजागृती पोहोचविण्यासाठी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका घरोघरी भेटी देणार आहेत.

शैक्षणिक संस्था आणि कामगार क्षेत्रातही बदल सुचविण्यात आले आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळांचे सत्र सकाळी घेण्याचा किंवा गरजेनुसार सुट्ट्या जाहीर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मैदानावरील खेळ दुपारी टाळावेत, तसेच मध्यान्ह भोजनात ताक किंवा ओआरएसचा समावेश करण्याचेही निर्देश आहेत. बांधकाम व इतर श्रमिकांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करून कामाच्या ठिकाणी सावली, थंड पाणी आणि प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे मालकांसाठी अनिवार्य करण्यात येणार आहे.

पर्यावरण आणि प्राण्यांच्या संरक्षणाकडेही लक्ष देण्यात आले आहे. वन विभागाने जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्याची योजना आखली आहे. पशुधन विभागाकडून पशुपालकांना जनावरांसाठी थंड पाणी व हिरवा चारा उपलब्ध ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय वाहतूक व पोलीस विभागालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. ट्रॅफिक सिग्नलवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी छत्री किंवा बूथची व्यवस्था करण्यात येणार असून सर्व सार्वजनिक बसमध्ये प्रथमोपचार पेटी व ओआरएस पाकिटे उपलब्ध ठेवली जाणार आहेत.

उष्मालाटेपासून बचावासाठी नागरिकांनी नियमित पाणी पिणे, नैसर्गिक पेये जसे की लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांचा आहारात समावेश करणे, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरणे आणि थेट सूर्यप्रकाश टाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, मद्य, जास्त साखर असलेली पेये किंवा कॅफिनयुक्त पेयांचे सेवन कमी करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्येक तालुक्यात नोडल अधिकारी नियुक्त करून परिस्थितीवर दैनंदिन लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने गरजू नागरिकांना छत्र्या आणि पादत्राणे उपलब्ध करून देण्याची योजना आहे. तसेच समाजमाध्यमांद्वारे हवामानाबाबतची नियमित माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे गरजेचे असून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांनी केले आहे.