अंबरनाथः राज्यात मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला असला तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या दोनच दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत जुनच्या सरासरीच्या ७१ टक्के पाऊस झाला आहे. यात ठाणे शहरात सर्वाधिक तर शहापूर तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. तर कर्जत, माथेरान भागात पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ नोंदवली गेली आहे.

जिल्हा पर्जन्यमान अहवालानुसार, कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात चांगला पाऊस पडतो आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुरूवातीलाही चांगला पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या. शुक्रवारी, ३ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात सरासरी ६९.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यातील एकूण पावसाची प्रगती २६९.१ मिलीमीटर इतकी झाली आहे. ३ जुलै रोजी ठाणे तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२६.५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. याशिवाय भिवंडीत ९३.५ मि.मी., अंबरनाथमध्ये ७६.१ मि.मी., उल्हासनगरमध्ये ७२.५ मि.मी. आणि कल्याणमध्ये ६३.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शहापूरमध्ये ४३.४ मि.मी. आणि मुरबाड तालुक्यात सर्वात कमी ३७.४ मि.मी. पाऊस पडला आहे.

तर जून महिन्यापासून आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार केल्यास, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकूण ३९५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरीचा विचार केल्यास हा पाऊस जूनपासूनच्या अपेक्षित सरासरीच्या ७१.५ टक्के इतका झाला आहे. यातही ठाणे तालुक्यात जूनपासून आतापर्यंत ६०१.५ मि.मी. पाऊस पडला असून, हे प्रमाण सरासरीच्या ९९.१ टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ठाणे शहरात पडला आहे. उल्हासनगर आणि भिवंडी तालुक्यांमध्ये अनुक्रमे ४४३.० मि.मी. (९४.७ टक्के) आणि ४८०.७ मि.मी. (८९.२ टक्के) पाऊस झाला आहे. मात्र, शहापूर तालुक्यात जूनपासून आतापर्यंत सर्वात कमी म्हणजेच केवळ २५५.५ मि.मी. पाऊस पडला असून, ते प्रमाण सरासरीच्या केवळ ४९.७ टक्के इतकेच आहे. विशेष म्हणजे, यावर्षी जून महिन्यात ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष केवळ १२६.४ मि.मी. पाऊस पडला होता.

उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ

कर्जत तालुक्यातून वाहत येणाऱ्या उल्हास नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. कर्जत, माथेरान भागात पडणारा दमदार पाऊस उल्हास नदी दुथडी भरून वाहण्यास कारणीभूत ठरतो. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत बदलापूर शहरात मोठी वाढ नोंदवली गेली. शुक्रवारी, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ११.८५ मीटरवर असलेल पाण्याची पातळी दुपारी १ वाजता ११.९४ मीटर तर दुपारी ३ वाजता १२.०४ मीटर इतकी झाली होती. त्यामुळे उल्हास नदी चौपाटीजवळच्या पात्रात नदी दुथडी भरून वाहताना दिसत होती.