ठाणे : ठाणे जिल्ह्यात मेट्रो मार्गिकेचे जाळे,अंतर्गत मेट्रो उभारली जात असतानाच रस्ते मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण कमी होईल असा अंदाज बांधला जात होता. परंतु खासगी वाहनांच्या नोंदीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ठाणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ७७ हजार ४४४ वाहनांची नव्याने नोंदणी झाली आहे.
सर्वाधिक वाहनांची नोंदणी ठाणे परिवहन विभागात झालेली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात हे प्रमाण २ लाख ३८ हजार ३७९ इतके होते. ठाणे जिल्हा वाहतुक कोंडीचे केंद्र झाले आहे. जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची वाहतुक होते. तसेच ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या भागात लोकवस्ती वाढू लागल्याने दररोज वाहनांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे वाहतुक कोंडी आणि प्रदूषणाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी अनेक भागात इमारतींमध्ये वाहनतळाची पुरेशी सोय नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या शहरांमध्ये अनेक भागात रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहने उभी केली जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी मागील काही वर्षांपासून मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली), मेट्रो पाच (ठाणे-भिवंडी-कल्याण) यासह अनेक महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांची निर्मिती केली जात आहे.
ठाणे शहरात नुकतीच अंतर्गत मेट्रो मार्गिका निर्माण प्रकल्पाची देखील हालचाल सुरु झाली आहे. असे असले तरी परिवहन विभागाकडील नोंदीनुसार, ठाणे जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ४४४ वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये सर्वाधिक दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच इतर वाहनांचा सामावेश आहे. सर्वाधिक वाहने दुचाकी आणि चारचारी मोटारी असून उर्वरित सुमारे १५ ते २० व्यवसायिक स्वरुपातील आहेत.
ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागा अंतर्गत १ लाख २४ हजार ९६ वाहनांची नोंद झाली. तर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागा अंतर्गत १ लाख ०८ हजार ७१ आणि वाशी (नवी मुंबई) उप प्रादेशिक परिवहन विभागा अंतर्गत ४५ हजार २७७ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामुले सातत्याने वाहन खरेदी होत असल्याचे दिसते आहे. चौकट ठाणे जिल्ह्यातील रस्ते अरुंद आहेत.
पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे असे असताना सराकर फक्त रस्ते, उड्डाणपूल बांधत आहे. मेट्रो प्रकल्प तयार करुन वाहतुक कोंडी सुटणार नाही. त्याऐवजी शहरातील सार्वजनिक परिवहन सेवा बळकट करणे आवश्यक आहे. महामार्गांवर सार्वजनिक बसगाड्यांसाठी वेगळी वाहिनी तयार करणे आवश्यक होते. परंतु आपल्याकडे कार केंद्रीत रस्ते तयार केले जातात.
अनेक राजकारणी लोकांचे वाहन विक्रीचे शो-रुम आहेत. यामागे लाॅबी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम व्यवसायिकांना सोयीस्कर रस्ते तयार केले जात आहे. शहरांमध्ये कसलेच नियोजन नाही. त्यामुळे प्रदूषण आणि वाहतुक कोंडी कमी होणे शक्य दिसत नाही. – निशांत बंगेरा, म्युज फाऊंडेशन.
ठाणे जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धूरामुळे प्रदूषण वाढते. तसेच फुफ्फुस, डोळे जळ-जळणे, त्त्वचेवर देखील परिणाम होतात. नागरिकांना वाहन खरेदीवर निर्बंध लावणे शक्य नाही. परंतु सरकारने सार्वजनिक वाहतुक सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. – मोहसीन शेख, वातावरण संस्था. चौकट
२०२४-२०२५ (१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५) ठाणे : १,०३,१५५
कल्याण- ९१,७९१ वाशी- ४३,४३३
एकूण – २,३८,३७९ २०२५-२०२६ (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) ठाणे : १,२४,०९६
कल्याण- १,०८,०७१ वाशी- ४५, २७७ एकूण – २,७७,४४४ एकूण – २,३८,३७९
