ठाणे – गंभीर व दीर्घकालीन आजारांनी त्रस्त रुग्णांना वेदनामुक्त आणि सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी राज्य शासनाच्या उपशामक काळजी (पॅलिएटिव्ह केअर) योजनेची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, हजारो रुग्णांना थेट घरपोच आरोग्य सेवांचा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण १ हजार ३३२ रुग्णांची नोंद झाली असून, आरोग्य पथकांकडून १ हजार ३१८ घरभेटी देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, रुग्णांच्या प्रकृतीनुसार नियमित तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशनावर भर देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
उपशामक काळजी म्हणजे गंभीर, दीर्घकालीन किंवा जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना पूर्णपणे बरे करण्यावर नाही, तर त्यांच्या वेदना कमी करून जीवनमान सुधारण्यावर केंद्रित केलेली वैद्यकीय सेवा. या काळजीत वेदनाशमन, शारीरिक त्रास कमी करणे, मानसिक आधार देणे, समुपदेशन तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक व सामाजिक पाठबळ देणे यांचा समावेश असतो. कर्करोग, पक्षाघात, वृद्धापकाळातील आजार किंवा इतर दीर्घकालीन आजारांमध्ये रुग्णाला सन्मानाने आणि शक्य तितक्या आरामदायी पद्धतीने जीवन जगता यावे, हा उपशामक काळजीचा मुख्य उद्देश असतो.
याच अंतर्गत आतापर्यंत एकूण १ हजार ३३२ रुग्णांची नोंद झाली असून, आरोग्य पथकांकडून १ हजार ३१८ घरभेटी देण्यात आल्या आहेत. मध्यम ते तीव्र वेदना असलेल्या ३४७ रुग्णांवर उपचार सुरू असून, कर्करोगग्रस्त १२७ रुग्णांना विशेष सेवा पुरविण्यात आली आहे. तसेच इतर आजारांनी ग्रस्त ४९७ रुग्णांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. तालुकानिहाय पाहता, अंबरनाथ (५४२), भिवंडी (२८६), मुरबाड (१९६), शाहापूर (२०६) आणि कल्याण (१०२) या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा देण्यात आल्या आहेत. घरभेटींच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत पोहोचून उपचार देण्यावर आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये पॅलिएटिव्ह केअर रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, बाह्यरुग्ण विभागात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार सुरू आहेत. आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा सेविका यांच्या माध्यमातून रुग्णांची नियमित तपासणी, औषधोपचार, समुपदेशन आणि कुटुंबियांना मार्गदर्शन केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या पुढाकारातून योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना घरच्या घरीच उपचार आणि मानसिक आधार मिळत आहे.
