ठाणे, कल्याण, उल्हासनगर : मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी पहाटेपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मशिदींसमोर पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी कलम १४९ कायद्यांतर्गत तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार १,७७५ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर, दुपापर्यंत आयुक्तालय क्षेत्रातील ३०० हून अधिकजणांना ताब्यात घेण्यात आले.
मशिदींच्या विश्वस्तांना पहाटेच्या वेळी भोंग्याचा वापर करून नमाज पठण करू नये असे आवाहन पोलिसांनी केल्याने पहाटे काही मशिदींमध्ये भोंग्याचा वापर करणे टाळण्यात आले. परंतु दुपारच्या वेळेत काही मशिदींवर भोंग्याद्वारे नमाज पठण करण्यात आले. त्याच्या आवाजाची पातळी अत्यंत कमी होती अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे कोणतेही प्रकार समोर आले नाही असे पोलिसांनी सांगितले.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण भागात मुस्लीम समाजातील नागरिकांचे वास्तव्य अधिक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात तैनात केला होता. यामध्ये राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, शीघ्र कृती दलाचा समावेश होता.
बुधवारी पहाटे मशिदींमध्ये नमाज पठण केले जाते. त्यामुळे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सर्वच मशिदींसमोर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच पोलिसांनी मशिदींचे विश्वस्त, धर्मगुरू यांची बैठक घेऊन त्यांना पहाटेच्या वेळेत नमाज पठण करताना भोंग्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते.
ठाणे शहरातील राबोडी, मुंब्रा, वागळे इस्टेट भागात सुमारे १५० मशिदी आहे. यातील अनेक मशिदींमध्ये सकाळी भोंग्यांविना नमाज पठण करण्यात आले. भिवंडीमध्येही १८१ मशिदी आहेत. यातील सुमारे ४० टक्के मशिदींमध्ये पहाटे भोंग्याचा वापर करण्यात आला नाही. तर ज्या ठिकाणी भोंगे होते. त्या ठिकाणी आवाजाची पातळी कमी होती अशी माहिती पोलिसांनी दिली. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका मशिदीसमोर पहाटे मनसेच्या कार्यकर्त्यांने ध्वनिक्षेपकावर हनुमान चालीसा वाजविली. त्याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर भिवंडी येथील टेमघर भागात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
कल्याणमध्येही शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्न केले होते. येथील मशिदींसमोर मंगळवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त होता. पहाटे येथे भोंग्याविना नमाज पठण करण्यात आले. बदलापूरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. ठाणे पोलिसांनी ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील मनसेचे कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार आणि १४९ कलमांतर्गत नोटिसा बजावण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार पोलिसांनी १,७७५ जणांविरोधात प्रतिबंधात्कम कारवाई केली. तर ३०० हून अधिक जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, दुपारच्या नमाजाच्या वेळेत बहुतांश मशिदींमध्ये भोंग्यांचा वापर करण्यात आला. मशिदीतील विश्वस्तांनी पोलिसाच्या आवाहनानुसार आवाजाची पातळी कमी ठेवली होती. पोलिसांकडूनही आवाजाची पातळीही मोजली जात होती.
मशिदीच्या विश्वस्त आणि मौलवींचा सत्कार
घोडबंदर येथील कापूरबावडी भागात जामा मशीद आहे. या मशिदीवरील भोंगे मशिदीच्या विश्वस्तांनी आणि मौलवींनी स्वत: उतरविले. त्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, उपायुक्त विनयकुमार राठोड, साहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी या मशिदीच्या विश्वस्त आणि मौलवींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
रिक्षा गायब
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी पहाटे पासून पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे ज्या रिक्षा चालकांकडे पुरेशी कागदपत्रे नव्हती. त्यांनी त्यांच्या रिक्षा चालविल्या नाहीत. बुधवारी सॅटीस खालील रिक्षा थांब्यावर रिक्षांची संख्या कमी पहायला मिळाली. या रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या मोठय़ाप्रमाणात रांगा लागल्या होत्या.