ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचणे, रस्त्यांवर पाण्याचा वेढा, वाहतूक विस्कळीत होणे, नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ आणि काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत असतानाच भारतीय हवामान विभागाने सोमवारी सकाळी जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा गंभीर इशारा जारी केला आहे. पुढील तीन ते चार तास ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसासह ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने सोमवारी सकाळी ९.१५ वाजता जारी केलेल्या सुधारित अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यासह मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका कायम आहे. ठाणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवत आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने जारी केलेल्या ”नाऊकास्ट” इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, झाडाखाली किंवा जीर्ण इमारतीजवळ थांबणे टाळावे तसेच जोरदार वाऱ्याच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नदी, नाले, धबधबे आणि पूरप्रवण भागांमध्ये जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासन, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता भारतीय हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाच्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार आज ठाणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा सर्वाधिक धोका असून मंगळवारीही जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. त्यानंतर बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरी पुढील दोन दिवस नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे
