ठाणे : वाढते शहरीकरण, लोकसंख्या व महसूल विभागावरील वाढता प्रशासकीय ताण लक्षात घेऊन राज्य शासनाने महसूल प्रशासनाच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. पुनर्रचनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, तर शहापूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले. महसूल यंत्रणेचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना अधिक गतिमान, सुलभ व प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
मुंबई महानगर प्रदेशाचा सातत्याने विस्तार, कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात झपाट्याने वाढणारे नागरीकरण व ग्रामीण भागातील वाढत्या प्रशासकीय गरजांमुळे महसूल विभागावरील कामाचा ताण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जमीन व्यवहार, फेरफार, वारसा नोंदी, विविध दाखले, भूसंपादन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत असल्याने महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली होती.
विशेषतः कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विस्तार आणि लोकसंख्या वाढ होत असल्याने महसूल विभागाकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय उभे राहणार असून त्याच्या कार्यक्षेत्रात कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाड या तालुक्यांचा समावेश असेल.
गतिमान निर्णयप्रक्रिया याची दखल घेत राज्य शासनाने महसूल यंत्रणेची पुनर्रचना करीत नव्या कार्यालयांच्या निर्मितीबरोबरच कार्यक्षेत्रांचे नव्याने विभाजन केले आहे. त्यानुसार कल्याण येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात येईल. त्यामुळे या परिसरातील महसूल कामकाजाला स्वतंत्र प्रशासकीय बळ मिळेल. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरील वाढता ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान होऊन नागरिकांची कामे कमी कालावधीत मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
आदिवासींसाठी सुविधा
शहापूर येथे मंजूर करण्यात आलेले उपविभागीय अधिकारी कार्यालय हे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र असलेल्या शहापूरमध्ये महसूल प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी या कार्यालयाची मदत होणार आहे. शहापूरसारख्या ग्रामीण भागात प्रशासन अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता होती.
