ठाणे – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा ९५.०४ टक्के निकाल लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात काहीशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. परंतू, असे असले तरी नेहमी प्रमाणे दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

मागील आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यापाठोपाठ शुक्रवारी, आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी १ लाख ११ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ०५ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ५३ हजार ३६३ मुलांचा आणि ५२ हजार ४५ मुलींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून ९६. ३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ९३.८० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.५७ टक्के लागला होता. तर, यंदाच्या वर्षी निकालामध्ये काही प्रमाणात घट झाली असून ९५.०४ टक्के निकाल लागला आहे.

यंदाही मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक

ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी १ लाख ११ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यामध्ये ५७ हजार १०५ मुले तर, ५४ हजार २१७ मुलींचा समावेश होता. ५७ हजार १०५ मुलांपैकी ५३ हजार ३६३ मुले तर, ५४ हजार २१७ मुलींपैकी ५२ हजार ४५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे यंदाही मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राचा सर्वाधिक निकाल

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राचा दहावीचा निकाल ९७.५५ टक्के लागला आहे. मिराभाईंदर शहारातून १० हजार २१९ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. यापैकी ९ हजार ९६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ५ हजार १३४ मुलांचा तर, ४ हजार ८३५ मुलींचा समावेश आहे.

शहर/तालुका (महापालिका निहाय्य)उत्तीर्ण मुलेउत्तीर्ण मुलीएकूण
ठाणे९३.६०%९६.१२%९४.८३%
नवी मुंबई</td>९५.२८%९७.३५%९६.२७%
मीरा भाईंदर९६.८१%९८.३५%९७.५५%
कल्याण डोंबिवली९५.६३%९७.१२%९६.३५%
उल्हासनगर९०.९९%९४.७४%९२.८४%
भिवंडी९०.३०%९५.७३%९३.११%
तालुका ( तालुका निहाय्य )उत्तीर्ण मुलेउत्तीर्ण मुलीएकूण
कल्याण८९.९०%९५.०२%९२.३२%
अंबरनाथ९५.१५%९६.९६%९६.०२%
भिवंडी८८.९८%९२.३१%९०.५६%
मुरबाड९१.३८%९४.११%९२.६९%
शहापूर९२.७३%९५.५८%९४.१२%
एकूण९३.८०%९६.३५%९५.०४%