ठाणे जिल्ह्याला एक लाख ४१ हजार लशींचा साठा

रेल्वे प्रवासासाठी दोन मात्रा सक्तीच्या केल्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे.

ठाणे : रेल्वे प्रवासासाठी दोन मात्रा सक्तीच्या केल्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग येण्यासाठी लशींचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. जिल्ह्य़ाला शुक्रवारी १ लाख ४१ हजार ९२० लशींचा साठा मिळाला असून यामध्ये १ लाख ३६ हजार कोविशिल्ड, तर ५ हजार ९२० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्य़ात मागील काही आठवडय़ांपासून मोठय़ा प्रमाणात लशींचा साठा उपलब्ध होत असल्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. जिल्ह्य़ात सध्या दिवसाला ६० ते ८० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. पूर्वी राज्य शासनाकडून जिल्ह्य़ाला आठवडय़ाला केवळ ६० ते ९० हजार लशींचा साठा उपलब्ध होत असे. हा साठा अवघ्या दोन ते तीन दिवसांत संपत असल्यामुळे नवीन साठा प्राप्त होईपर्यंत जिल्ह्य़ातील काही लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येत होती.

जुलै महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात ओसरू लागल्यामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून राज्य शासनाने ज्या नागरिकांचे करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत, त्या नागरिकांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी दिली. ठाणे जिल्ह्य़ात खासगी कार्यालयांत काम करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. रेल्वे सेवा सुरू नसल्यामुळे या नागरिकांना खासगी तसेच काही सार्वजनिक वाहनाने कार्यालये गाठावे लागत होते. यामध्ये त्यांचा अधिकचा पैसा तसेच वेळ खर्च होत होता. आता, रेल्वे प्रवासासाठी लशीच्या दोन मात्रा पूर्ण करणे सक्तीचे असल्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली आहे. लसीकरणासाठी नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता मागील काही आठवडय़ांपासून जिल्ह्य़ाला राज्य शासनाकडून आठवडय़ाला एक ते दीड लाख लशींचा साठा मिळत असून लसीकरण मोहिमेचा वेग वाढला आहे.

जिल्ह्याला शुक्रवारीही एक लाख ४१ हजार ९२० लशींचा साठा राज्य शासनाकडून मिळाला असून यामध्ये १ लाख ३६ हजार कोविशिल्ड, तर ५ हजार ९२० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane district stock one lakh 41 thousand vaccines ssh