ठाणे : दिवा येथील मुंब्रा देवी काॅलनी भागात अतिक्रमणावर कारवाईसाठी सुरु असताना बुधवारी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर दगडफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दगडफेकीत दिवा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त प्रवीण फड आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुरक्षारक्षक विकास दराडे जखमी झाले.

ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाचे पथक बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमरास मुंब्रादेवी कॉलनीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होते. यावेळी हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या प्रद्युम गुप्ता (२४) याने कारवाईला विरोध करत लाकडी दांडा उचलून अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुरक्षा रक्षकाने त्याला रोखल्यानंतर त्याने महापालिका अधिकारी पुन्हा कारवाईसाठी आल्यास मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्याने महापालिका कर्मचारी शिवाजी सांगळे यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. त्याचवेळी घटनास्थळी जमलेल्या गर्दीतून दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी पालिकेच्या पथकाच्या दिशेने दगडफेक केली. या दगडफेकीत साहाय्यक आयुक्त प्रवीण फड यांच्या पायाला तर सुरक्षा रक्षक दराडे यांच्या पायाला दुखापत झाली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.