ठाणे : विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही. कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचे राजकीय अस्तित्व उडून जाईल, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली. महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येणार, असा दावादेखील त्यांनी केला.

ठाण्यातील रहेजा गार्डन येथे पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधक दररोज आरोपांची फटाके फोडतात, पण त्यांच्या त्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. आम्ही कामगिरीच्या ॲटम बॉम्बने महाराष्ट्र उजळविणार आणि विरोधकांचा धुरळा उडवणार आहोत असा टोला शिंदे यांनी लगावला. आमचे लक्ष विकासावर आहे आणि विरोधकांचे काम फक्त आरोप, टीका करणे आहे असेही ते म्हणाले.

ठाण्यातील तरुणाई जितका उत्साह आणि जल्लोष दिसतो. तो महाराष्ट्राचे भविष्य आहे. ही परंपरा आनंद दिघे यांनी रुजवली आणि आम्ही ती पुढे नेत आहोत, असे शिंदेंनी सांगितले. गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी ठाण्याचा प्रत्येक सण शक्तीचे प्रदर्शन असते. ठाणेकर हे माझं कुटुंब आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो असे ते म्हणाले. आज मला आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. बाळासाहेबांनी ठाण्यावर प्रेम केलं, दिघे साहेबांनी विकास केलाय. म्हणूनच ठाण्याला सणांची पंढरी म्हणतात असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणे आमची संस्कृती

शेतकरी संकटात असताना शिवसेना आणि महायुती सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. आम्ही दिलेले वचन पाळले. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा पैसा पोहोचतो. या पुरात धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या गाई वाहून गेल्या. त्या शेतकऱ्यांना १०१ दुभत्या गायी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. कारण शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणं ही आमची संस्कृती आहे, असे शिंदेंनी सांगितले.

मोदी-शहांमुळे मदत

पूर परिस्थितीत केंद्राने मोठी मदत केली. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपामुळे शक्य झाली. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही पुन्हा बहुमताने विजयी होणार आहोत. राज्यातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आम्ही काम करतो आणि जनता त्याचं उत्तर मतपेटीत देते असेही शिंदे म्हणाले.

विरोधकांना पराभव दिसू लागला

विरोधकांना आता पराभव दिसू लागला आहे म्हणून ते निवडणूक आयोग, ईव्हीएम, महायुती आणि आम्हाला दोष देतात. निवडणुका होऊ शकल्या नाहीत कारण याचिका सर्वोच्च न्यायालयात होती. त्याला आम्ही जबाबदार नाही असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

तर ॲटम बाॅम्ब फुटणार

विरोधक निवडणुका घेऊ नका अशी विनंती करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे. निवडणूक झाली तर महायुतीचा ॲटम बॉम्ब थेट त्यांच्या खुर्चीखाली फुटणार अशी टीकाही त्यांनी केली.