ठाणे : येत्या काही दिवसांत दिवाळी सणाला सुरुवात होणार असल्याने रविवारी ठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. ठाण्यातील विविध भागांतून नागरिक जांभळीनाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठेत दाखल झाले होते. या भागातील दुकानांमध्ये कंदील, तोरण, पणत्या, दिवे तसेच दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ वाढल्याने परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ठाणे शहरातील घाऊक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठ आणि जांभळी नाका येथे दरवर्षी दिवाळीच्या खरेदीसाठी शहराच्या विविध भागांतून नागरिकांची गर्दी होते. यंदाही रविवारी या दोन्ही बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ होती. बाजारपेठेत आकर्षक कंदील, तोरण, पणत्या आणि विद्युत दिव्यांचे विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध असल्याने या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तसेच दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल होता.

दुसरीकडे, नौपाडा, गोखले रोड आणि राम मारुती रोड परिसरातही रात्रीच्या वेळी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांनी दुकानांवर, रस्त्यांवर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे हा परिसर उजळून निघाला होता. पाचपाखाडी परिसरातही खाद्यपदार्थ, मिठाई आणि विविध शोभेच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानक परिसर आणि जांभळी नाका येथील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. तलावपाली, कोर्टनाका आणि नौपाडा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. खरेदी आटोपून घरी परतणाऱ्या नागरिकांना रात्री वेळेत रिक्षा आणि बसगाड्या उपलब्ध होत नव्हत्या.