ठाणे : दिवाळीच्या खरेदीसाठी नौपाडा आणि ठाणे बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी उसळल्याने मंगळवारी सायंकाळी ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, राम मारुती रोड, तलावपाली आणि गोखले रोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत कामावरून घरी परतणारे नोकरदार अडकल्याने त्यांचे मोठे हाल झाले.
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ठाणे शहरातील नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड आणि ठाणे बाजारपेठ परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. या भागातील रस्त्यांवरच दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. कंदील, पणत्या, तोरणे, विद्युत रोषणाईचे साहित्य यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून नागरिक या बाजारपेठांमध्ये येत आहेत. त्यामुळे बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम होत आहे.
मंगळवारी सायंकाळी या गर्दीचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. राम मारुती रोड, तलावपाली, गोखले रोड आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हे रस्ते शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने कोंडीचा परिणाम आसपासच्या भागांतील वाहतुकीवरही झाला. मुंबईत कामानिमित्त गेलेले नोकरदार सायंकाळी घरी परतत असताना या कोंडीत अडकले. त्यामुळे घरी पोहोचण्यास विलंब झाल्याने नोकरदारांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
