ठाणे – दिवाळीच्या सणात पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी स्टेम कंपनीपाठोपाठ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरसह एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या अनेक शहरांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमआयडीसीने यासंदर्भात अद्याप लेखी आदेश जारी केलेले नसले, तरी जिल्ह्यातील महापालिकांना तोंडी सूचना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा यंत्रणांनी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले होते. यामध्ये स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी, महापालिकांच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजना आणि मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा समावेश होता. दिवाळीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्टेम कंपनीने ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी शहरांसह ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातील २ आणि ९ नोव्हेंबर रोजीचे नियोजित पाणीपुरवठा बंद रद्द केले आहेत.
ठाणे महापालिकेनेही स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील या दोन दिवसांची कपात रद्द केली आहे. त्यानंतर आता एमआयडीसीनेही दिवाळीच्या काळातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील निम्म्या शहरांना दिलासा मिळणार आहे. चौकट एमआयडीसीकडून बारवी धरणातून विविध औद्योगिक वसाहती आणि शहरांना पाणीपुरवठा केला जातो. अंबरनाथ, बदलापूर, अतिरिक्त अंबरनाथ, तळोजा, डोंबिवली, टीटीसी, वागळे इस्टेट आणि ठाणे या औद्योगिक वसाहतींसह नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मीरा-भाईंदर आणि परिसरातील वसाहतींना या योजनेतून पाणी मिळते. या शहरांतील नागरिकांना पाणी कपातीच्या निर्णयामुळे दिवाळीच्या कालावधीत दिलासा मिळणार आहे. एमआयडीसीने यासंदर्भात अद्याप लेखी आदेश जारी केलेले नसले, तरी जिल्ह्यातील महापालिकांना तोंडी सूचना दिली आहे, अशी माहिती ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कोणत्या भागाला किती पाणी?
एमआयडीसीच्या बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर धरणाची साठवण क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर झाली आहे. बारवी धरणातून सोडलेले पाणी बारवी नदीमार्गे उल्हास नदीत येते. जांभूळ गावाजवळील संगमाच्या खालील बाजूस बंधाऱ्याद्वारे पाणी अडविले जाते. त्यानंतर वसत येथील अशुद्ध जलउदंचन केंद्रातून पाणी उचलून जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. प्रक्रिया केल्यानंतर विविध औद्योगिक वसाहती आणि शहरांना त्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात १५० दशलक्ष लिटर, नवी मुंबई शहरात ७५ दशलक्ष लिटर, ठाणे शहरात १४१ दशलक्ष लिटर, मीरा-भाईंदर शहरात ९० दशलक्ष लिटर, कल्याण शहरात ७५ दशलक्ष लिटर, उल्हासनगर शहरात १५५ दशलक्ष लिटर, पनवेल शहरात १ दशलक्ष लिटर, अंबरनाथ शहरात २१ दशलक्ष लिटर, ग्रामपंचायती व इतर क्षेत्रात ५५ दशलक्ष लिटर आणि वहन व्यय ७० ते ८० दशलक्ष लिटर असा पाणी पुरवठा दररोज होतो.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीनेही पाणी कपात रद्द करावी, अशी मागणी आपण केली आहे. एमआयडीसीने ही मागणी मान्य केली असून, त्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मात्र, एमआयडीसीकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण आणि कार्यकारी अभियंता दिलीप आव्हाड यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, कपात रद्द करण्यासंदर्भात एमआयडीसीने अद्याप लेखी आदेश जारी केलेले नसले, तरी जिल्ह्यातील महापालिकांना तोंडी सूचना दिली आहे, अशी माहिती ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
