ठाणे – ठाण्यातील तलावपाली आणि वसंत विहार भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बुधवारी दोघांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसंत विहार येथे १९ वर्षाच्या मुलाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. तर तलावपाली येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
यातील पहिली घटना वसंत विहार येथील तुळशीराम भागात घडली. साहिल पांचाळ असे मृत मुलाचे नाव असून समाज माध्यमावर साहिल याच्या मैत्रिणीला त्रास दिला जात होता. त्याचा जाब विचारल्याने बुधवारी दुपारी कुणाल डोळस (२३) चिन्मय डोळस (१९) आणि विवेक राजे (२०) यांनी त्याच्यासोबत वाद घातला. या वादा नंतर कुणाल याने त्याच्याकडील चाकूने साहिल यास भोसकले. तर त्याच्या १७ वर्षीय भावाला देखील जखमी केले. यात साहिलचा मृत्यू झाला. या घटने प्रकरणे चितळसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना तलावपाली जवळ घडली. तलावपाली येथील पदपथावर झालेल्या वादात एकाने दुसऱ्या एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
