ठाणे : ठाणे शहरात सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लर व अमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण पिढीवर परिणाम होत आहे. त्याविरोधात ‘नशामुक्त ठाणे’ अभियान राबविले जात आहे. मात्र, ठाणे स्थानक ते घोडबंदरपर्यंत २० हून अधिक ठिकाणी नशेचा खुला बाजार सुरू असल्याचा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. अशा १३ ठिकाणांची यादीच आमदार केळकर यांनी पोलीस आयुक्तांना देऊन कारवाईची मागणी केली आहे.
आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून नशामुक्त ठाणे अभियान राबविण्यात येत आहे. या चळवळीला काही प्रमाणात यश येत असले तरी, आजही अनेक ठिकाणी हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा दावा केळकर यांनी केला आहे.
नशामुक्त भारत व ठाण्यात नशामुक्त ठाणे अभियान सुरू आहे. ठाणे शहरात आजही अनेक ठिकाणी अवैध धंदे, हुक्का पार्लर सुरू असल्याने येथे कोंबिंग ऑपरेशनची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या अमली पदार्थ, एम. डी. चरस, गांजा विक्रीसंबंधी तक्रारी काही जागरुक नागरिकांनी केल्या आहेत. टपऱ्या, महामार्ग या ठिकाणी चरस, गांजा, ड्रग्ज विक्री व हुक्का पार्लर सुरू असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
