ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मासेमारी बंद झाल्याने सुक्या मासळीची मागणी वाढते. मात्र, यंदा आवक कमी झाल्याने सुक्या मासळीच्या दरात १०० ते १५० रुपयांची वाढ झाली असून यामुळे ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे. मर्यादित प्रमाणातच खरेदी केली जात असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.
मच्छीमारांच्या जीवित आणि वित्तीय सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. त्यामुळे ताज्या मासळीची आवक घटली असून पावसाळ्यात खोल समुद्रातील तसेच खाडीतील मासळीचे प्रमाण कमी होते. परिणामी, या काळात मांसाहार करणाऱ्या नागरिकांचा कल सुक्या मासळीच्या सेवनाकडे वाढतो. बोंबील, जवळा, कोलंबीचे सोडे, वाकट्या आणि करंदी या सुक्या मासळीच्या प्रकारांना विशेष मागणी असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मासळीची आवक कमी झाल्याने सुक्या मासळीच्या दरात वाढ झाली आहे. सध्या करंदीचे पॅकेट ५०० रुपयांना, बोंबीलची चार पॅकेट १५० रुपयांना, तर जवळा अर्धा किलो २५० रुपयांना विकला जात आहे.
एप्रिल आणि मे महिन्यातील कडक उन्हाचा फायदा घेत अनेक कुटुंबे सुक्या मासळीची खरेदी करून ती पुन्हा उन्हात वाळवून सुरक्षित साठवून ठेवतात. मासेमारी बंदीच्या काळात ताज्या मासळीची टंचाई आणि वाढते दर यांचा सामना करण्यासाठी ही पारंपरिक पद्धत आजही अनेक घरांमध्ये अवलंबली जाते. मात्र, यंदा वाढलेल्या किमतींचा परिणाम विक्रीवरही होत असल्याचे विक्रेते गोविंद यांनी सांगितले. यंदा पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात ग्राहक खरेदी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही सुकी मासळी प्रामुख्याने भाईंदर आणि कुलाबा परिसरातून आणली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उन्हाळ्यातील तयारी, पावसाळ्यातील सोय
उन्हाळ्यात वाळवून तयार करण्यात आलेली सुकी मासळी पावसाळ्यात अनेक घरांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक बनते. ग्रामीण भागासह ठाणे, मुंबई आणि उपनगरांतील अनेक कुटुंबे पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीचा साठा करून ठेवतात. बदलत्या जीवनशैलीतही ही परंपरा टिकून असली, तरी वाढलेल्या किमतींमुळे यंदा खरेदीचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे.
दर वाढले
यंदा सुक्या मासळीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३५० ते ४०० रुपयांना मिळणारे करंदीचे पॅकेट सध्या ५०० रुपयांना विकले जात आहे. चार पॅकेट बोंबीलसाठी पूर्वी १०० रुपये मोजावे लागत होते, तर आता त्यासाठी १५० रुपये द्यावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, जवळा अर्धा किलोचा दर १५० ते २०० रुपयांवरून २५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी कायम असली तरी वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांकडून मर्यादित प्रमाणात खरेदी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
