ठाणे : ठाणे पूर्व भागातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सॅटीस प्रकल्पाच्या कामात अडसर ठरत असलेली सहा घरे आणि पाच दुकानांची बांधकामे पालिकेने हटविण्याची कारवाई बुधवारी केली. यामुळे सॅटीस प्रकल्पातील अडसर दूर झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू ठाणे पूर्व भागात सॅटिस प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या कामात काही निवासी आणि वाणिज्य बांधकामे अडसर ठरत होती. यामुळे या कामास विलंब होत होता. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोपरी भागाचा पाहाणी दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सॅटीस प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला होता. त्या वेळेस त्यांनी बाधित बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याचे आणि तेथील नागरिकांचे तातडीने पुनवर्सन करून हे काम अधिक गतीने करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व बाधित बांधकामे निष्कासित करून नागरिकांचे पुनवर्सन करण्याचे काम पालिकेने बुधवारी केले.
या कारवाईमध्ये ठाणे स्थानकाजवळील ६ घरे, ५ दुकाने आणि मंगला हायस्कूलजवळील घरांची बांधकामे हटविण्यात आली. ही कारवाई उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केली.
दरम्यान ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहीम सुरू असून त्यामध्ये दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.