ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर मालवाहू वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कॅडबरी जंक्शन परिसरातील लेक शोर मॉलजवळ घडलेल्या या अपघातात महेश मोरे (४२) यांच्या पायाला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मालवाहू वाहन चालक जुनैद खान (३१) याने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर वाहनचालकांनी त्याचा पाठलाग करून त्याला अडविले.

घोडबंदर येथील मानपाडा परिसरात राहणारे महेश मोरे हे सोमवारी रात्री दुचाकीवरून घरी परतत होते. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ते कॅडबरी जंक्शनजवळील ‘लेक शोर’ मॉल परिसरात पोहोचले असता, भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळे मोरे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या पायाला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, मोरे यांची दुचाकी मालवाहू वाहनाच्या पुढील भागात अडकली होती. असे असतानाही चालकाने वाहन न थांबवता दुचाकीसह पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इतर वाहनचालकांनी मालवाहू वाहनाचा पाठलाग केला. अखेर त्यांनी वाहन अडवून चालक जुनैद खान याला पकडले. अपघातानंतर मोरे यांना प्रवाशांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरे यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मालवाहू वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.