ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूलावर बुधवारी सायंकाळी क्रेन उलटली. या घटनेमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर रांगा लागल्या आहेत. आनंदनगर-साकेत उन्नत प्रकल्पाच्या निर्माण कामासाठी ही क्रेन वापरली जात होती अशी माहिती वाहतुक पोलिसांनी दिली.

ठाणे, घोडबंदर, भिवंडी, कल्याण, नाशिक आणि समृद्धी महामार्गाची हजारो वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने वाहतुक करतात. या मार्गावरील वाहतुक कोंडीत घट व्हावी यासाठी आनंदनगर साकेत उन्नत मार्गिकेच्या (एलिव्हेटेड रोड) प्रकल्पाचे काम सुरु आहे. येथील कोपरील रेल्वे पूलावर खोदकाम सुरु असून यामुळे सकाळी आणि रात्री वाहन चालकांना कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो.

या परिसरात मोठी यंत्रे देखील उभी असतात. बुधवारी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरील एक क्रेन अचानक उलटली. क्रेनचा भाग रस्त्याच्या दिशेने झुकल्याने ठाणे पोलिसांनी येथील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला.

कोपरी पूल ते नितीन कंपनी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातामुळे बघ्यांची गर्दी झाल्याने मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरही कोंडी झाली होती.

येथील वाहतुक कोपरी भागातील अंतर्गत मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे या पर्यायी मार्गावरही कोंडी झाली होती. सायंकाळी ५ नंतरही येथील वाहतुक कोंडी सुटली नव्हती. तसेच अपघातग्रस्त क्रेन देखील बाजूला काढण्यात आली नव्हती. वाहतुक पोलिसांकडून कोंडी सोडविण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु वाहनांचा भार वाढल्याने कोंडी वाढली होती. या मार्गावरून वाहतुक करणाऱ्या प्रवाशांना कोंडीचा फटका सहन करावा लागला.