ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनातून विशेषत: रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल क्षणार्धात हिसकावून पसार होणाऱ्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी या संवेदनशील पट्ट्यावर विशेष लक्ष केंद्रीत करत करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या मार्गावरील हिसकावून मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांसह गस्ती वाढविण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग हा ठाणे, मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज हजारो वाहने या मार्गावरून धावतात. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्याही जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीवर पळ काढणाऱ्या टोळ्यांनी मागील काही वर्षांत धुमाकूळ घातला आहे. विशेषत: खारेगाव ते कॅडबरी जंक्शन आणि तीन हात नाका उड्डाणपूल हा पट्टा मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा ”हॉटस्पॉट” ठरला आहे.

या परिसरात नौपाडा, राबोडी आणि कळवा पोलीस ठाण्यांच्या हद्दी येतात. या गुन्ह्यांचे गांभीर्य जून २०२१ मधील एका दुर्दैवी घटनेतून समोर आले होते. तीन हात नाका येथे रिक्षातून प्रवास करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मोबाईल वाचविण्याच्या प्रयत्नात ती रिक्षाबाहेर फेकली गेली आणि अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या घटनेनंतरही मोबाईल हिसकावण्याच्या घटनांवर पूर्णपणे अंकुश बसलेला नाही.

त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांमध्ये आजही असुरक्षिततेची भावना कायम आहे. काही वर्षांपूर्वी मराठी मालिकांमधील अभिनेता संकेत कोर्लेकर यांचाही पूर्व द्रुतगती महामार्गावर रिक्षातून प्रवास करताना मोबाईल चोरट्यांनी हिसकावला होता. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांची गंभीर दखल घेत ठाणे पोलिसांनी अखेर या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत महामार्गावर धावणाऱ्या रिक्षाचालकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबाबत सूचना करण्याची माहिती चालकांना देण्यात आली आहे.

रिक्षातून प्रवास करताना मोबाईल रस्त्याच्या बाजूला न धरता रिक्षेच्या आतील बाजूस वापरावा, अशी सूचना प्रवाशांना करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, चोरीच्या घटनांपासून सावध राहण्याचे संदेश देणारे जनजागृती फलकही येत्या काही दिवसांत पूर्व द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. तसेच, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्यातील पथके तयार केली आहेत.

महामार्गावरील जबरी चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे. येत्या काही दिवसांत फलक देखील उभारण्यात येतील. चोरट्यांचाही शोध घेतला जात आहे. प्रवासादरम्यान वाहनाच्या खिडकीजवळ किंवा रिक्षेच्या बाहेरील बाजूस मोबाईल वापरणे टाळावे. – बाळासाहेब पाटील, उपायुक्त, परिमंडळ एक.

१ जानेवारी ते ३१ जून

२०२५ –

पोलीस ठाणे – दाखल – उघड

नौपाडा – ५ – ०

राबोडी – १०- ५

कळवा- १-१

चौकट

१ जानेवारी ते ३१ जून

२०२६ –

पोलीस ठाणे – दाखल – उघड

नौपाडा – ७ – २

राबोडी – ७- ०

कळवा- २-०

 

]