कल्याण – बारावीच्या मंगळवारपासून सुरू झालेल्या परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणून शासन, शिक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे. ठाणे जिल्हा शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व बारावीच्या परीक्षा केंद्र चालकांनी बारावी परीक्षेचा पेपर संपल्यानंतर प्रत्येक परीक्षा खोली आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रण संकलित करायचे आहे. आणि ते सीसीटीव्ही चित्रण जिल्हा शिक्षण विभागाकडे जमा करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी बारावी परीक्षा केंद्र संचालकांना दिले आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना एकही काॅपीचे प्रकरण घडता कामा नये यादृष्टीने शिक्षण विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. विशेष भरारी पथके विभागवार तैनात केली आहेत. दहावी, बारावी परीक्षा केंद्रांच्या बाहेर आणि विद्यार्थी परीक्षा देत असलेल्या वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शिक्षण संस्था चालकांना देण्यात आले आहेत.

तसेच, ज्या परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्या ठिकाणी तेथील शिक्षकांना अन्य परीक्षा केंद्रावर नियुक्त करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. ठाणे जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रे ही परीक्षा काॅपी केंद्रे म्हणून ओळखली जातात. यामधील काही केंद्रे शिक्षण विभागाने या केंद्रांमधील काॅपीच्या वाढत्या प्रकाराने यापूर्वीच बंद केली आहेत. जिल्ह्यात एकही काॅपीचा प्रकार घडू नये म्हणून जिल्हा शिक्षण विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे.

बारावी परीक्षेचा पेपर संपल्यानंतर परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकाने परीक्षा केंद्रातील सर्व वर्ग खोल्यांमधील आणि शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण संकलित करायचे आहे. हे चित्रण एक पेन ड्राईव्हमध्ये स्थापित करून ते जिल्हा शिक्षण विभागाकडे नियमित जमा करण्याची जबाबदारी केंद्र संचालकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेचा पेपर संपल्यानंतर केंद्र संचालकांना आता परीक्षांचे पेपर व्यवस्थित बंदिस्त करून ते जमा करून घेणे या जबाबदारी बरोबर आता सीसीटीव्ही चित्रण संकलित करण्याची जबाबदारी वाढली आहे.

बारावी परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटर परिसरातील झेराॅक्स केंद्रे गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या काळात बंद ठेवण्यात येत आहेत. शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी ठाणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन परीक्षा केंद्रातील खोल्यांची पाहणी करत आहेत. या काटेकोर कडक पध्दतीमुळे केंद्र चालक आपल्या परीक्षा केंद्रात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची विशेष काळजी घेताना दिसत आहेत.