ठाणे : उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम आता अंड्यांच्या दरावरही दिसून येत असून, आठवडाभरात दोनदा प्रत्येकी १० रुपयांची वाढ झाल्याने अंड्यांनी शंभरी गाठली आहे. ८० रुपये डझनवरून प्रथम ९० रुपये आणि रविवारपासून १०० रुपये डझन दराने अंडी विकली जात असून, यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे. वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांचे खाद्य सेवन कमी झाल्याने अंडी उत्पादन घटले असून, आवक कमी झाल्यामुळे दरवाढ झाल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे.

अंडी हा स्वस्त आणि दर्जेदार प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. शासनाकडूनही दररोज अंड्याचे सेवन करावे अशा स्वरूपाच्या जनजागृती पर जाहिराती केल्या जातात. परंतु गेल्या काही दिवसंपासून महागाई होत असतानाच, आता अंड्यांच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एक डझन अंडी १०० रुपये दराने विकली जात आहेत. गेल्या आठवड्यात अंड्यांचा दर ९० रुपये डझन होता. त्याआधी तो ८० रुपये डझन इतका होता. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत अंड्यांच्या किमतीत तब्बल २० रुपयांची वाढ झाली आहे.

सध्याच्या दरानुसार एका अंड्याची किंमत ८.३३ रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी एका अंड्यासाठी ७.५० रुपये मोजावे लागत होते. म्हणजेच प्रति अंड्यामागे ८३ पैशांची वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला, खेळाडू आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी अंडी हा स्वस्त आणि दर्जेदार प्रथिनांचा स्रोत मानला जातो. त्यामुळे त्यांना दरवाढीचा फटका बसत आहे. आरोग्याच्या दृष्टीने अंड्यांचा आहारात समावेश ठेवणे आवश्यक असून यामुळे दरवाढीनंतरही नागरिक अंडी खरेदी करत आहेत.

उत्पादन घटले

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने अंड्यांचे दर वाढल्याचे बोललेले जात होते. मात्र, अंडी महागण्यामागे उष्णतेचा मोठा परिणाम असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले. यंदा वाढलेल्या तापमानामुळे कोंबड्या नेहमीपेक्षा अधिक पाणी आणि कमी खाद्य घेत आहेत. त्यामुळे त्यांची अंडी देण्याची क्षमता कमी झाली असून उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात अंड्यांची आवक कमी झाली आहे. दुसरीकडे मागणी कायम असल्याने पुरवठा आणि मागणीतील तफावत वाढून दरात वाढ झाली आहे. याच कारणामुळे आठवडाभरात दोन टप्प्यांत डझनामागे एकूण २० रुपयांची वाढ होऊन अंड्यांचे दर १०० रुपये डझनवर पोहोचल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी स्पष्ट केले.