ठाणे : थुंकल्याचा जाब विचारल्याने ७६ वर्षीय सरोश दस्तूर यांना एका परप्रांतीय प्रवासी वाहन चालकाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोबाईल काॅलद्वारे दस्तूर यांना संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. तसेच, त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले.

कॅडबरी जंक्शन येथील ज्युपिटर रुग्णालय परिसरातील गृहसंकुलात दस्तूर हे त्यांच्या पत्नीसोबत वास्तव्यास आहे. ते पारशी समाजाचे असून मंगळवारी रात्री ते पत्नीसोबत पायी जात होते. त्याचवेळी प्रवासी वाहन कार चालक निशांत शुक्ला हा त्याच्या कारमधून बाहेर थुंकला. हा प्रकार दस्तूर यांनी बघितल्यानंतर त्यांनी कार चालकाला थुंकू नको असे सांगितले. त्यामुळे निशांत याने त्यांना शिवीगाळ तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. निशांत याने दस्तूर यांना दगड हातात घेऊन मारहण्याचा देखील प्रयत्न केला.

हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रीत करण्यात आला होता. हे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निशांत याचा शोध घेऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी नितेश पाटोळे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सरोश यांना उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी मनसेचे नेते अविनाश जाधव हे त्यांना भेटले.

अविनाश जाधव यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मोबाईलद्वारे त्यांच्याशी संभाषण करुन दिले. तर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही दस्तूर यांची भेट घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत व्हिडीओ काॅल द्वारे संपर्क साधून दिला. प्रवासी वाहतूक कार चालक निशांत शुक्ला हा कारमधून बाहेर थुंकला. त्यास वृद्ध व्यक्तीने थुंकू नको असे म्हटल्याने कार चालकाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो हाताने वृद्धाला मारहाण करु लागला.

काहीवेळाने कार चालकाने पदपथालगत पडलेला दगड उचलून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वृद्ध पदपथावर खाली पडले. त्यात त्यांना दुखापत झाली. बेदम मारहाण होत असतानाही उपस्थित काहीजण बघ्याची भूमिका घेत होते. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यामवर प्रसारित झाले.