ठाणे : ठाणे महापालिका निवडणूकीत कथित पैशांचे वाटप झाल्याचा आरोप ठाकरे गट आणि मनसेने केला होता. सोमवारी ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी देखील उमेदवारांना पैशांनी विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले होते. तसेच कथित पैसे नाकारणाऱ्या उमेदवारांचे नाव घेऊन आणि व्यासपीठावर बोलावून त्यांचे स्वागत केले होते. परंतु कथित पाच कोटी रुपयांची ऑफर नाकारणाऱ्या ठाण्यातील राजश्री नाईक यांचा शिंदे गटाच्या उमेदवाराने पराभव केला.

ठाणे महापालिका निवडणूक आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवारांसमोरी काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर मनसे, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांना पैशांचे वाटप झाल्याची चर्चा सुरू होती.

सोमवारी दोन्ही ठाकरे बंधूंची ठाण्यात सभा झाली होती. या सभेच्या वेळी काही उमेदवारांनी पैसे नाकारल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच उमेदवारांचे भर सभेत नावे घेऊन त्यांचे कौतुक केले होते. यामध्ये ठाणे पूर्व येथील कोपरी येथून निवडणूक लढविणाऱ्या राजश्री नाईक यांचा उल्लेख देखील केला होता. त्यांनी पाच कोटी रुपये नाकारल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. राजश्री नाईक यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे कौतुक देखील त्यांनी केले होते.

पाच कोटी आणि पराभव

राजश्री नाईक या कोपरी येथील प्रभाग क्रमांक २० मधून मनसेकडून निवडणूक लढवित होत्या. प्रभाग क्रमांक २० हा भाग कोपरी काॅलनी, चेंदणी (पूर्व), पारसी काॅलनी, ठाणेकरवाडी, बारा बंगला असा परिसर आहे. या जागेसाठी शिवसेना (शिंदे गट) कडून नम्रता हेमंत पमनानी या राजश्री नाईक यांच्याविरोधात उभ्या होत्या. राजश्री नाईक यांना ९ हजार २८० मते मिळाली. तर पमनानी यांना १६ हजार ५७५ इतकी आणि नोटा ला तब्बल १ हजार २९७ इतकी मते होती.