उच्चभ्रू वस्तीही मतदानासाठी रांगेत

मतदान हा भारतीय नागरिकाचा हक्क असल्याने प्रत्येकाने तो बजावणे गरजेचे आहे.

उच्चभ्रूंच्या वसाहतींमधूनही मोठय़ा संख्येने नागरिक मतदानासाठी रांगेत उभे राहिल्याचे दिसून आले.

 

घोडबंदर भागात मतदारांची भाऊगर्दी

कुठे  गृहसंकुलाजवळ बुथवर मतदारांना त्यांचा अनुक्रंमाक शोधून देण्यासाठी लॅपटॉप घेऊन बसलेले कार्यकर्ते, कुठे मतदान करण्यासाठी अध्र्या तासापासून रांगेत उभे असलेले मतदार, तर कुठे मतदान झाल्यानंतर सेल्फी काढणारे मतदार.. अशा वातावरणात मंगळवारी घोडबंदर रोड येथील परिसरातील मतदानप्रक्रिया उत्साहात पार पडली. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील उच्चभ्रूंच्या वसाहतींमधूनही मोठय़ा संख्येने नागरिक मतदानासाठी रांगेत उभे राहिल्याचे दिसून आले.

नवे ठाणे म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेला हा भाग कावेसरपासून ते बाळकूम- माजिवडापर्यंत पसरलेला आहे. या भागातील ब्रह्मांड, हिरानंदानी इस्टेट, निळकंठ व्हॅली, विजयनगरी, हायलँड रेसिडेन्सी, लोढा गृहसंकुल अशा भागात मोठय़ा प्रमाणावर उच्चभ्रू नागरिक रहिवासाला असून आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ते देखील रस्त्यावर उतरले. त्यामुळे उच्चभ्रू नागरिक मतदान करत नाही अशी सतत ओरड करणाऱ्या टीकाकारांना येथील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून चोख प्रत्युत्तर दिले. मतदान हा भारतीय नागरिकाचा हक्क असल्याने प्रत्येकाने तो बजावणे गरजेचे आहे. मी सध्या ७४ वर्षांचा. कधीही माझा मतदानाचा हक्क मी गमावला नाही. ठाण्यातील नागरिक मोठय़ा प्रमाणात आपला मतदानाचा अधिकार बजावत असल्याने योग्य तो उमेदवार निवडूण येण्यास मदत होईल. काही दिवसांपूर्वीच एका अपघातात मला जबर दुखापत झाली होती. कर्तव्य असल्याने मी मतदान करण्यासाठी बाहेर पडलो असे ब्रह्मांड येथील रहिवासी आणि निवृत्त सैनिक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, या परिसरातील काही भागांना पोलिसांनी संवेदनशील भाग म्हणून घोषित केल्याने येथे सकाळी ७ वाजल्यापासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. त्यामुळे दुपापर्यंत येथे कोणत्याही प्रकारचे तणावाचे वातावरण पाहायला मिळाले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane elections voters in ghodbunder elite class vote thane civic polls