ठाणे – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनावट मद्य आणि परराज्यातून कर चुकवून आणल्या जाणाऱ्या दारूच्या तस्करीविरोधात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ऑक्टोबर २०२६ मध्ये सात गुन्हे दाखल करून १० आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गेल्या सात महिन्यांत तब्बल ६ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जप्त मुद्देमालात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
दिवाळीच्या काळात बनावट मद्याची विक्री तसेच परराज्यातून कर चुकवून मद्याची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा अधिक्षक प्रवीण तांबे यांच्या पथकाकडून ठाणे जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे. बनावट मद्य, परराज्यातील कर चुकवलेले मद्य आणि बनावट विदेशी स्कॉचच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ऑक्टोबर मध्ये सात गुन्हे दाखल करून १० आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कात वाढ झाल्यानंतर परराज्यातील तुलनेने स्वस्त मद्याची तस्करी आणि बनावट मद्यनिर्मितीच्या प्रकारांत वाढ झाल्याचे विभागाच्या कारवाईतून दिसून येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाने केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता अवैध मद्यविक्रीविरोधातील कारवाईत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. २०२४ मध्ये ही रक्कम ९० लाखांवर, तर २०२५ मध्ये ३ कोटी २५ लाख रुपयांवर पोहोचली. यंदा एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांत तब्बल ६ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जप्त मुद्देमालात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
बनावट मद्यापासून सावध राहण्याचे आवाहन
दिवाळीच्या काळात ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि बनावट किंवा विषारी मद्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथके तैनात केली आहेत. संशयास्पद ठिकाणी तपासणी करून अवैध मद्यविक्रीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अनधिकृत ठिकाणांहून किंवा स्वस्त दराच्या आमिषाला बळी पडून मद्य खरेदी करू नये. बनावट आणि कमी प्रतीचे मद्य आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे मद्य खरेदी करताना अधिकृत विक्री केंद्रांचाच वापर करावा, असे आवाहन ठाणे जिल्हा अधिक्षक प्रवीण तांबे यांनी केले आहे. अवैध मद्यविक्रीविरोधातील ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
